पुणे : फ्लेक्सवर सदनिका खरेदी करू नये, म्हणून बांधकामाबाबत खोटी माहिती पसरवली. तसेच, बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी बांधकाम व्यावसायिकास ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जयप्रकाश जगन्नाथ गिरमे (वय ६७, रा. प्रभात रस्ता) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन सोमनाथ जांभूळकर (वय ४६, रा. भैरोबानाला, वानवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची वानवडीत वडिलोपार्जित जमीन आहे. गिरमेबाग येथील त्यांच्या जागेवर विकसकाकडून महापालिकेच्या परवानगीनंतर विकसनाचे काम सुरू आहे. सचिन जांभूळकर हा जून २०२४ पासून बांधकामाच्या जागेबाबत गैरसमज निर्माण होईल, अशी माहिती प्रसारित करीत आहे. बांधकामातील सदनिका खरेदी न करण्याबाबत या जागेच्या मालकीबाबत फ्लेक्सद्वारे गैरसमज पसरवत आहे. त्यामुळे फिर्यादी यांचे व्यावसायिक नुकसान होत आहे.
फिर्यादीच्या मिळकतीच्या बाजूची जमिनीवर वनीकरणासाठी परवानगी मिळाल्याचा पाटबंधारे विभागाच्या खडकवासला कार्यकारी अभियंत्याचा बनावट आदेश तयार केला. याआधारे मिळकतीत हक्क मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच, बांधकाम पूर्णत्वास न्यायचे असल्यास ५० लाख रुपये द्या, अशी धमकी देऊन खंडणी मागितली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यजित आदमाने करीत आहेत.