चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदापासून टीम इंडिया दोन विजय दूर आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करताच टीम इंडियाला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. पण यासाठी टीम इंडियाला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान असणार आहे. आयसीसी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचं पारडं कायमच जड दिसून आलं आहे. इतकंच काय तर वनडे क्रिकेटमध्येही ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा वरचढ ठरली आहे. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 151 सामने झाले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 84 सामन्यात, तर भारताने 54 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 10 सामन्यांचा निकाल लागला नाही. आयसीसी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताच्या स्वप्नांवर पाणी टाकलं आहे. आतापर्यंत दोन्ही संघ आयसीसी स्पर्धेत 18 वेळा आमनेसामने आलेत. यात ऑस्ट्रेलियाने 10 तर भारताने 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना निकालाविना संपला आहे. आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत आठ वेळा भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले आहेत. यात दोन्ही संघांनी 4-4 अशी बाजी मारली आहे. मागच्या तीन बाद फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं आहे. असं असताना या उपांत्य भारताला एक फायदा आहे. जर तसं समीकरण जुळून आलं तर भारताला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळू शकतं.
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतील साखळी फेरीच्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात बांग्लादेश, दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केलं आहे. यासह अ गटात भारतीय संघ टॉपला आहे. तर ब गटात ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात इंग्लंडला पराभूत केलं. त्यानंतर दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि प्रत्येकी एक गुण मिळाला. 4 गुणांसह ऑस्ट्रेलिया ब गटात दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया असा उपांत्य फेरीत सामना होणार आहे.
उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया या सामन्यात पाऊस पडेल अशी काही शक्यता नाही. पण जर पावसाने हजेरी लावली आणि 4 मार्चला सामना पूर्ण झाला नाही तर राखीव दिवशी सामना खेळला जाईल. 5 मार्च हा भारत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस आहे. पण राखीव दिवशीही सामना झाला नाही तर भारताला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. कारण भारतीय संघ साखळी फेरीतील अ गटात टॉपला आहे.