पुणे : मेट्रो प्रवाशांसाठी ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ उपक्रमांतर्गत पुणे मेट्रोतर्फे आनंदनगर मेट्रो स्थानकाच्या चार किलोमीटरच्या परिसरात ई-स्कूटर सेवा सुरू केली आहे. मेट्रोतर्फे प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या उपक्रमांतर्गत प्रवाशांना ई-स्कूटर भाडेतत्त्वावर मिळणार आहे. यासाठी मेट्रोने ‘जेनेसिस इलेक्ट्रिक मोबिलिटी’ स्टार्टअप कंपनीशी करार केला आहे. सध्या ही सेवा आनंदनगर स्थानकापासून एमआयटी विद्यापीठापर्यंत उपलब्ध केली आहे.
या नावीन्यपूर्ण प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या आवारातदेखील फिरता येणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या आवारात तीन वाहनतळ (डॉकिंग स्टेशन) तयार केली आहेत. तीन रुपये प्रति मिनीट स्कूटरचे भाडे आहे, ते इतर सार्वजनिक वाहनांच्या तुलनेत कमी असून आम्हाला परवडणारे आहे, असे विद्यार्थ्यांचे मत आहे. अनिरुद्ध गुंजाळ, अजय मोरे आणि हर्षीत अगरवाल यांनी तयार केलेल्या ‘स्कूट’ ही ई-स्कूटर फक्त अर्ध्या युनिट चार्जिंगमध्ये ३० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते.
ॲपद्वारे विद्यार्थी बुक करू शकतात. तसेच, विद्यापीठाच्या आवारातील कोणत्याही वाहनतळावर ती थांबवू शकतात. स्कूटरमधील सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांच्या ई-मेल आणि आधारकार्डच्या माहितीने स्कूटरचे ट्रॅकिंग करते. बुकिंग आणि भाडे भरण्याची सेवा ही ॲपवर असल्याने विद्यार्थ्यांना ती जलद व सोयीचे वाटत आहे.
स्कूटरमध्ये २५० वॉटची मोटर असल्याने तिचा कमाल वेग २५ किलोमीटर प्रति तास इतका आहे. यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार ही ई-स्कूटर चालविण्यासाठी वाहन परवान्याची आवश्यकता नाही. तसेच, या स्कूटरसह विद्यार्थी मेट्रोमध्येदेखील प्रवास करू शकतात.
कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनावणे म्हणाले, ‘‘भविष्यात जास्तीत जास्त मेट्रो स्थानकांमध्ये उपक्रम सुरू करण्याचा मेट्रोचा प्रयत्न आहे. हा उपक्रम फक्त विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न ठेवता, यामध्ये आणखी सुधारणा करून त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घेता यावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.’’
उपक्रमामुळे आम्हाला विद्यापीठात येणे सोयीचे झाले आहे. याच्या साह्याने आम्ही विद्यापीठाच्या आवारात फिरण्यासही मदत होते. आर्थिकदृष्ट्या परवडणारा आणि पर्यावरणाशी अनुकूल उपक्रम आहे.
- एक विद्यार्थी
मेट्रो प्रवाशांसाठी ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ उपक्रम महत्त्वाचा आहे. स्थानकाच्या आवारात फिरण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी हा पर्याय महत्त्वाचा आहे.
- डॉ. हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक मेट्रो प्रशासन व जनसंपर्क
उपक्रम अद्याप प्रायोगिक तत्त्वावर असला, तरी भविष्यात आम्ही त्याचे जाळे वाढविण्याचा प्रयत्न करू. शहरातील सर्व मेट्रो स्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी ही सेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- अनिरुद्ध गुंजाळ, जेनेसिस इलेक्ट्रिक मोबिलिटी