पराग ढोबळे, साम टीव्ही
नागपूर : प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्याशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. छत्रपती शिवरायांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं होतं. त्यानंतर प्रशांत कोरटकर विरोधात राज्यातील विविध भागात गुन्हे दाखल झाले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतरही आरोप फेटाळून लावणारा प्रशांत कोरटकर फरार झाला होता. त्यानंतर आज प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण करत नतमस्तक झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांवर काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने प्रशांत कोरटकर चर्चेत आला होता. त्याने आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करत नतमस्तक झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रशांत कोरटकर म्हणाला की, 'महाराष्ट्र जगभरात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या नावाने ओळखला जातो. ज्यांच्या कथा, शौर्य ऐकून आम्ही लहान याचे मोठे झालो. आजही त्यांच्या कहाण्या आणि कथा प्रत्येकाला प्रेरणा देणारे असतात. अशा छत्रपतींना मानाचा मुजरा करत जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ असं बोलतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळचं वळण लागलं आहे.
प्रशांत कोरटकरने पत्रात काय म्हटलं?एक पत्र देखील समोर आलं आहे. या पत्रात प्रशांत कोरटकर म्हणाला की, 'महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी सदैव वंदनीय, आदरणीय असेच आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हेही माझे प्रेरणास्त्रोत आहेत. शिवाजी महाराजांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि त्यासाठी मी नम्रतेने त्यांना नमस्कार आणि वंदन करत असतो.
' एक आध्यात्मिक राजेच होते आणि ते या महाराष्ट्राला लाभले हे आपले परम भाग्य या भवानी मातेच्या पुत्राने असामान्य धैर्य आणि तलवार गाजवून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना त्रिवार वंदन परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम। धर्मसंस्थापनार्थी य संभवामी युगे युगे. त्यासाठी निसर्ग आपली अलौकिक माणस निर्माण करतो, त्यातला एक परमोत्कर्ष बिंदू म्हणजे आपले शिवाजी महाराज होते, असे कोरटकरने पुढे लिहिले.
'पुत्र कसा असावा हे आपण छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकतो, हे माझे त्यांच्या बद्दलचे स्वाभाविक विचार... छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडावर जाण्याचा मला अनेकदा योग आता आणि त्या निमित्ताने मी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन केले आहे. आजच्या प्रसंगी मी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊ मा साहेबांना मानाचा मुजरा करतो, असे पत्रात पुढे म्हटले आहे.