संगमनेर : सहकारामुळेच ग्रामीण भागामध्ये शिक्षण आणि उद्योग पोहोचले. त्यामुळे महाराष्ट्राची भरभराट झाली. जुन्या पिढीने कर्तृत्वातून सहकार निर्माण केला आहे. त्या पिढीच्या कीर्तीप्रमाणे कृती करणारे महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व बाळासाहेब थोरात हे सहकाराबरोबरच सर्वसामान्यांच्या विकासासाठी अविरतपणे काम करणारे लोकनेते असल्याचे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी काढले.
सांगली येथील भावे नाट्यगृह येथे गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्यावतीने सहकारतीर्थ गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे होते. व्यासपीठावर माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, सांगली काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा ट्रस्टचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी आमदार विक्रम सावंत, डॉ. दयानंद नाईक, अप्पासाहेब पाटील, नेताजीराव पाटील, डॉ. लता देशपांडे, बाबासाहेब ओहोळ, विक्रम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल, बुके व २५ हजार रुपये रोख पुरस्कार देऊन माजी मंत्री थोरात यांचा सन्मान करण्यात आला.
आमदार जयंत पाटील म्हणाले की, साहित्य विचार करायला लावते. महात्मा गांधींनी सर्वधर्म समभाव देशामध्ये रुजवला. मात्र आता मनभेद निर्माण केला जात आहे. देशाचे पुढील भवितव्य चिंताजनक असून, आर्थिक परिस्थिती ही काळजी करण्यासारखी आहे. थोरात म्हणाले की, तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांना २५ वर्षांपूर्वी या पुरस्काराने गौरवले होते.
तोच पुरस्कार पुन्हा आपल्याला मिळाल्याने हा आनंद व योगायोग आहे. यशवंतराव चव्हाण यांनी कृषी औद्योगिक क्रांती घडून आणली आणि त्यातून सहकार चळवळ उभी राहिली. त्यांनी कार्यकर्त्यांना मोठी ताकद दिली. भाऊसाहेब थोरात यांचा विचार घेऊन आपण सहकारात प्रामाणिकपणे व चांगला हेतू ठेवून काम केल्याने संगमनेरचा सहकार फुलला आहे.
पुस्तके ही माणसाला जगायला शिकवतात. लेखक आणि पुस्तकांमध्ये ताकद असून, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा जपण्यासाठी वाचन संस्कृती वाढवली पाहिजे. याकरीता पुरस्काराच्या रकमेत काही रक्कम टाकून डॉ. भवाळकर यांची पुस्तके विविध विद्यालयांमधील विद्यार्थ्यांना देणार आहे.
- बाळासाहेब थोरात, माजी मंत्री