आयपीएल 18 व्या मोसमाला (IPL 2025) 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामात 10 संघांमध्ये 13 शहरांमध्ये 74 सामने खेळवण्यात येणार आहेत. या हंगामासाठी काही संघांनी त्यांच्या नव्या कर्णधारांची नावं घोषित केली. तर कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात येणार? अशी चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये रंगली होती. तसेच कर्णधारपदासाठी रिंकू सिंह आणि अजिंक्य रहाणे या दोघांची नावं आघाडीवर चर्चा होती. आता अखेर या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे. मुंबईकर अजिंक्य रहाणे याची कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोलकाताच्या गोटात एकूण 21 खेळाडू आहेत. केकेआरने आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शनआधी एकूण 6 खेळाडू रिटेन केले. तर इतरांना करारमुक्त केलं होतं. श्रेयस अय्यर याने त्याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 17 व्या मोसमात केकेआरला तब्बल 12 वर्षांनी ट्रॉफी जिंकून दिली होती. मात्र त्यानंतरही टीम मॅनजमेंटने श्रेयस अय्यर याला करारमुक्त केलं. त्यानंतर केकेआरने दुबईत झालेल्या ऑक्शनमधून एकूण 15 खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलं. अजिंक्य रहाणे याचाही यात समावेश होता.
रहाणे मेगा ऑक्शनमधील पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला होता. रहाणेला 10 पैकी एकाही संघाने घेण्यास रस दाखवला नाही. मात्र त्यानंतर केकेआरने रहाणेला झटपट फेरीतून 1 कोटी 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. केकेआरने श्रेयसला करारमुक्त केल्याने मेगा ऑक्शननंतर आता कर्णधार कोण असणार? याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. संघात अजिंक्य रहाणे अनुभवी खेळाडू असल्याने त्याचं नाव आघाडीवर होतं. तसेच वेंकटेश अय्यर आणि रिंकू सिंह या दोघांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र अखेर रहाणेने बाजी मारलीय. तसेच वेंकटेश अय्यर याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केकेआरडून सोशल मीडियावरुन कर्णधार रहाणेसाठी खास पोस्ट करण्यात आली आहे.
रहाणे केकेआरचा कर्णधार
अजिंक्य रहाणे याने आयपीएलमध्ये 185 सामने खेळले आहेत. रहाणेने 185 सामन्यांमधील 171 डावांत 123.42 च्या स्ट्राईक रेटसह आणि 30.14 च्या सरासरीने 4 हजार 642 धावा केल्या आहेत. रहाणेने या दरम्यान 30 अर्धशतकं आणि 2 शतकंही झळकावली आहेत.
कोलकाता नाइट रायडर्स टीम – एकूण खेळाडू : 21
नवे खेळाडू : वेंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाज, एनरिक नॉर्खिया, अंगकृष रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडेय, मनीष पांडे, रोवमन पॉवेल, स्पेन्सर जॉनसन, अनुकूल रॉय, उमरान मलिक, मोईन अली, अजिंक्य रहाणे आणि लवनीथ सिसोदिया.
रिटेन खेळाडू : सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, रमनदीप सिंह आणि रिंकू सिंह.