MP Supriya Sule : लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवता येत नसेल, तर अशी सत्ता काय कामाची?
esakal March 04, 2025 11:45 AM

पुणे - 'सरकारने लाडक्या बहिणींसाठी निवडणुकीपुर्वी मोठी यंत्रणा वापरली, पण त्याच बहिणीला हे सरकार सुरक्षित ठेवु शकत नसेल, तर अशी सत्ता काय कामाची? आता त्याच बहिणींना महिलेला हे सरकार आपल्याबरोबर उभे राहात नाही, असे वाटते.

अशावेळी सरकार मागे उभे राहीले नाही तरी चालेल, पण उभा महाराष्ट्र त्या लेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल.' अशा शब्दात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टिका करत पिडीत महिलांना धीर दिला. 'कोणीही त्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले, तर आम्ही त्यांच्याविरुद्ध न्यायालयात जाऊ' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

खासदार सुळे यांनी सोमवारी दुपारी स्वारगेट एसटी बसस्थानक येथे भेट देऊन लैंगिक अत्याचाराच्या घटनास्थळाची पाहणी केली. सुळे म्हणाल्या, "स्वारगेटमधील घटना अतिशय असंवेदनशीलपणे हाताळली गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्र्यांना संवेदनशील राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मंत्र्यांनी संवेदनशील वागावे.

या घटनेला ज्या दिशेने नेण्याचा प्रयत्न झाला, हे अतिशय दुर्दैवी आहे. त्या मुलीला प्रचंड भिती दाखवली गेली. जलदगती न्यायालयाद्वारे अशा गुन्हेगारांना भर चौकात फाशी दिली गेली पाहीजे, असे महाराष्ट्राचे उदाहरण सरकारने देशासमोर द्यावे.'

महिला पोलिस अधिकारी, गृहराज्यमंत्री, वकीलांनी पिडीतेबाबत केलेल्या वक्तव्याबाबत सुळे म्हणाल्या, 'लाडक्या बहिणींबद्दल इतके बोलता, मग या प्रकरणात पिडीत तरुणीविषयी सरकारकडुन आलेले वक्तव्य योग्य आहेत का ? तीही कोणाची तरी मुलगी आहे.

मुख्यमंत्र्यांनी स्वीय सहाय्यकांप्रमाणेच आपल्या मंत्र्यांनाही चाप लावावा.' वाल्मिक कराडला 'व्हिआयपी' सेवाच नव्हे, तर त्यांना या सरकारमध्ये खुन, खंडणी, कौटुंबिक हिंसाचार, शेतकऱ्यांचा पैसा खाणे माफ आहे. कराड व त्यांच्या आकाकडे असे काय आहे, की या सरकारला त्यांनी वेठीस धरले आहे, असा प्रश्नही सुळे यांनी उपस्थित केला.

सुळे यांना बनेश्वर रस्ता दुरुस्तीचे आश्वासन

भोरमधील श्री क्षेत्र बनेश्वर येथील देवस्थानाकडे जाणाऱ्या बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या दुरवस्था झालेल्या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणासाठी सुळे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र 'पीएमआरडीए'चे आयुक्त योगेश म्हसे यांनी सुळे यांच्याशी फोनद्वारे संवाद झाला.

त्यावेळी 'पीएमआरडीए'चे अभियंते संबंधित रस्त्याची पाहणी करून दोन आठवड्यात रस्ता तातडीने दुरुस्त करतील, पुढील सहा महिन्यात बनेश्वर विकास आराखड्याची अंमलबजावणी केले जाईल, असे आश्वासन म्हसे यांनी दिले. त्यामुळे दोन आठवड्यांसाठी उपोषण स्थगित केल्याची माहिती सुळे यांनी दिली.

सुळे म्हणाल्या,

- चाकणमधील पोलिसांवर कोयता गॅंगचा हल्ला धक्कादायक

- रक्षा खडसे यांच्या मुलीबाबत घडलेला प्रकार वाईट आहे.

- बीड कष्टकऱ्यांचा सुसंस्कृत जिल्हा ३-४ लोकांमुळे देशभरात बदनाम झाला

- बीडच्या प्रकरणात सरकारने राजकारण बाजुला ठेवुन संवेदनशीलपणा दाखवावा

- मुंडे व कोकाटेंमुळे त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.