Dhananjay Munde : राजकीय महत्वकांक्षेपोटी काकांची साथ सोडली, कोण आहेत धनंजय मुंडे?
GH News March 04, 2025 03:12 PM

महाराष्ट्र सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो काल समोर आले. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर आज महाराष्ट्राच्या राजकारणात काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील अशी अपेक्षा होती, तसं घडलं सुद्धा आहे. मागच्या दोन महिन्यांपासून अनेकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. आज अखेर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. कारण संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. सीआयडीच्या आरोपपत्रात वाल्मिक कराडच मास्टर माइंड असल्याच स्पष्ट झालय. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

हे फोटो समोर आल्यानंतर कालरात्री देवगिरीवर अजित पवारांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे राजीनामा मागितल्याच बोलल जात होतं. त्यानुसार धनंजय मुंडे यांनी आज सकाळी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांच्यावर पहिल्यांदा असे आरोप झालेले नाहीत.

राजकीय महत्त्वकांक्षेपोटी काकांची साथ सोडली

धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातील परळी विधानसभेचे आमदार आहेत. ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपनीथ मुंडे यांचे बंधु पंडित अण्णा मुंडे यांचे सुपूत्र आहेत. धनंजय मुंडे हे कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेत आहेत. सख्खे काका गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. पुढे राजकीय महत्त्वकांक्षेपोटी ते काकांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. तिथे अजित पवार यांचा विश्वास त्यांनी संपादन केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची राजकीय कारकीर्द बहरली. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांना मिळाल्या. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर 2019 साली त्यांनी पंकजा मुंडे यांना पराभूत करुन हिशोब चुकता केला.

जन्म कधीचा, पत्नीच नाव काय?

2019 साली महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे मंत्री बनले. धनंजय मुंडे यांचा जन्म 15 जुलै 1975 साली बीडमध्ये झाला. भाजपच्या युवा मोर्चाचे ते प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते. राजश्री मुंडे त्यांच्या पत्नीच नाव असून आदिश्री मुंडे ही त्यांची कन्या आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधी दाखल झाले?

भाजप युवा मोर्चामधून धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवात केली होती. 2012 साली ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि पंकजा मुंडे यांचे चुलत बंधु आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.