बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने सर्वत्र खळबळ माजली आहे. आरोपींनी किती क्रूर आणि अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या केली याचे फोटो आणि व्हिडीओ समोर येताच सर्वांना धक्का बसला आहे. या प्रकरणावर राजकिय तसेच मनोरंजन विश्वातून देखील प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. दरम्यान, प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या घटनेची तुलना थेट औरंगजेबाशी केली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या संतोष देशमुख प्रकरणावर प्रतिक्रिया देत बच्चू कडू म्हणाले, ‘मला असे वाटते की एकंदरीत एवढी निर्घृण हत्या झाली आणि एवढं सगळं होऊन राजकारणी लोकांनी त्यावर राजकारण केलं आहे. खरं तर हा दोन जातीतला वाद नसून ही प्रवृत्ती आहे. ज्या प्रमाणे संतोष देशमुखची हत्या झाली ती कशा प्रकारे झाली? ते कुठल्या प्रवृत्तीचे लोक होते? त्यांची जात कोणती होती? हा विषय महत्त्वाचा नाही. त्यांची जी प्रवृत्ती होती ती फार मला असे वाटते की एखाद्या दुश्मनाच्याही म्हणजे कुठल्या औरंगजेबानेही केले नसेल असे कृत्य करून ठेवले आहे.’
पुढे ते म्हणाले, ‘अशा प्रवृत्तीला ठेचण्यासाठी तुम्हाला इतकी वर्ष लागतात. ती प्रवृत्ती वाढली कशी? कोणी खतपाणी घातले? ही जबाबदारी तिथल्या पोलिस प्रशासनाची नाही का? हे सगळं कसं आहे डोंगर मोठा झाल्यानंतर आता तुम्ही उंदराची चाल चलत आहात. वास्तविक याच्यामध्ये हे सगळं हत्या झाली म्हणून उघडकीस आले. मग एकंदरीत चालू काय होतं बीडमध्ये? कोणाच्या आशिर्वादाने चालू होतं? राजकारण म्हणजे सगळच काही असे समजणारे जे लोक आहेत आणि राजकारणासाठी काही पण, कुठे पण आणि कसे पण करण्याची जी प्रवृत्ती आहे या देशामधील लोकांमध्ये वाढली आहे त्याचे हे मोठं उदाहरण आहे.’
या प्रकरणी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होताना व्हिडिओ कॉलद्वारे पाहिल्याचे गंभीर आरोप करण्यात आले. त्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांना 302 कलमाखाली गुन्हा दाखल करून सह आरोपी करावे तसेच त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. अधिवेशन काळात या मागण्या पूर्ण नाही केल्या तर 6 मार्चनंतर मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी राज्यभर दौरे करून सर्व सामाजिक आणि मराठा संघटनांना भेटून एकत्र करून अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विधानभवनावर मोर्चा काढणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील नागणे यांनी दिली आहे.