चाळीसगाव- राज्यात एस. टी.च्या तिकीट दरात १४.९५ टक्के दरवाढ लागू झाली असून वाढीव दरानुसार ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेतील पास दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या योजनेसाठी आता वर्षभर एकच दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या नियमांमध्ये आणि अटी शर्तीमध्ये सुधारणा केल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
असे असले तरी तिकीट दरवाढीनंतर आवडीच्या प्रवास पाससाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. एस. टी. महामंडळाकडून ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेंतर्गत ४ आणि ७ दिवसांचे पास दिले जातात. यासाठी वर्षभर वेगवेगळे हंगामी दर असतात.
एस. टी. महामंडळाने या योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये सुधारणा केल्यामुळे वर्षभर आता एकच दर राहणार आहेत. पासच्या दरामध्ये श्रेणीनुसार वाढ करण्यात आली असून साध्या गाडीतून प्रवासासाठी ६४४ ते १ हजार १३१ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला अधिकच भुर्दंड सोसावा लागणार आहे.
ई-शिवाईसाठी सर्वाधिक भाडे एस. टी.च्या ई-शिवाईच्या पासकरिता प्रवाशांना कमीत कमी १ हजार ४३३ तर जास्तीत जास्त ५ हजार ३ रुपये मोजावे लागणार आहेत. चार दिवसांच्या ई-शिवाईच्या प्रवास पाससाठी प्रौढांना २ हजार ८६१ रुपये, मुलांना १ हजार ४३३ रुपये आणि ७ दिवसांच्या पासकरिता प्रौढांना ५ हजार ३ रुपये आणि मुलांना २ हजार ५०४ रुपये मोजावे लागणार आहे. राज्यातील तीर्थस्थळे, पर्यटन स्थळ आणि अन्य प्रेक्षणीय स्थळांसाठी विना व्यत्यय प्रवास करता यावा, यासाठी एस. टी. महामंडळाने ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विशेष पास देण्यात येत असून पासच्या माध्यमातून राज्यातील सर्व बसगाड्यांमधून अमर्यादित प्रवासाची मुभा आहे. १२ वर्षांखालील मुलांना मोफत प्रवासाची सुविधा या योजनेत आहे.