Maharashtra Politics News live : धनंजय मुंडे यांचा राजीनामा
Sarkarnama March 04, 2025 11:45 PM
Dhananjay Munde Resignation:फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारला

संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.

Dhananjay Munde News : धनंजय मुंडे आजच राजीनामा देणार?

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे आता तीव्र पडसाद उमटले असून राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. बीडमध्ये बंदची हाक देण्यात आली असून मराठा आंदोलन मनोज जरांगे यांच्यासह सुरेश धस यांनी सरकारवर जोरदार निशाना साधत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यादरम्यान आता धनंजय मुंडे आपला राजीनामा आजच देण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ते आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांकडे राजीनामा सुपूर्त करण्याची शक्यता आहे. तर 'सातपुडा' बंगल्याच्या पोलीस सुरक्षेतही वाढ करण्यात येत आहे.

Suresh Dhas News : संतोष देशमुख यांची हत्या हे विकृतीचं लक्षण : सुरेश धस

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता संतापाची लाट उसळली आहे. यावरून सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. तर याच मुद्द्यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली हे विकृतीचं लक्षण असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच सुरेश धस यांनी, अशी विकृती आणि क्रूर मानसिकता आपल्याला लवकरच ठेचावी लागेल. आता दुसरा संतोष देशमुख होऊ द्यायचा नसेल तर आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशीही मागणी सुरेश धस यांनी केली आहे.

Santosh Deshmukh Murder Case : बीड बंदला सुरुवात, मुख्य मार्केटमध्ये शुकशुकाट

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला आता सुरुवात झाली असून शहरातील मुख्य मार्केटमध्ये शुकशुकाट आहे. येथील सुभाष रोडवरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मध्यरात्री उशिरा बंदची हाक देण्यात आली होती.

Abu Azmi News : अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : नरेश म्हस्के

संभाजी महाराज यांना त्रास देणाऱ्या औरगंजेब याची स्तुती करणाऱ्या अबू आझमी यांच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. तर याबाबत विरोधात राज्यपालांकडे देखील तक्रार करणार असल्याचेही म्हस्के यांनी आहे.

Santosh Deshmukh Murder Case News : देशमुख हत्या प्रकरण : बीड बंद, पोलीस अधीक्षकांचे आवाहन

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटोज माध्यमात वायरल झाल्यानंतर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. यातील आरोपींना फाशी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यादरम्यान जनतेने कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी केले आहे.

Santosh Deshmukh Murder Case News : धनंजय देशमुख ढसाढासा रडले

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाचे फोटो समोर आले असून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा निश्चित मानला जात आहेत. दरम्यान मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुख मनोज जरांगे यांच्यासमोर ढसाढासा रडले. तसेच माझ्या भावाला किती वेदना झाल्या असतील. मला आता वेदना सहत नाहीत, मला आई समोर बसल्याने, मुलं येथे असल्याने मला रडताही येत नाही. मला भावाला वाचवता आले नाही, अशी खंत धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

Santosh Deshmukh Murder Case News : संतोष देशमुख हत्याप्रकरण: मनोज जरांगेंनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट

संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आल्याचे फोटो आता समोर आले आहेत. यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. बीड जिल्ह्यातील राज्यातील वातावरण या प्रकरणामुळे आणखी तापणार असून अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान मराठा आंदोलन मनोज जरांगे देखील मस्सा जोगमध्ये दाखल झाले असून त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे. त्यांनी धनंजय देशमुख आणि कुटुंबियांनी धीर दिला आहे.

Beed News : संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीड बंदची हाक? मनोज जरांगे घेणार देशमुख कुटुंबियांची भेट

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. यानंतर बीड जिल्ह्यातील नागरिक आक्रमक झाले असून बीड बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबत पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे. दरम्यान आज मराठा आंदोलन मनोज जरांगे देखील मस्सा जोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता?

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून बीड बंदची हाक देण्यात आली आहे. तर आज मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.