चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना मंगळवारी (४ मार्च) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळवला जात आहे. दुबईला होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २५० धावांचा टप्पा ओलांडण्यात यश मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी २६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
दोन्ही संघांनी आत्तापर्यंत दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे, त्यामुळे आता ते हा सामना जिंकून तिसऱ्या विजेतेपदाकडे महत्त्वाचे पाऊल टाकण्यात उत्सुक असतील. तसेच भारताने गेल्या दोन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामना खेळला आहे. त्यामुळे आता भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.
या सामन्यात संघ सर्वबाद झाला असला, तरी मोठी धावसंख्या उभारण्यासाठी फलंदाजांनी शेवटपर्यंत चांगली झुंज दिली. त्यांच्याकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरेने अर्धशतके साकारली.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा सामना जिंकायचा असेल, तर इतिहास रचावा लागणार आहे. कारण यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आयसीसी वनडे स्पर्धेत सर्वोच्च धावांचा पाठलाग २६१ इतकाच झाला आहे. हा पाठलागही २०११ वनडे वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने केला होता. पण आता भारताला हा विक्रम मोडावा लागेल, तरच भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचणार आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड आणि कुपर कोनोली यांनी सलामीला फलंदाजी करताना डावाची सुरूवात केली. पण कुपर कोनोलीला शून्यावरच मोहम्मद शमीने माघारी धाडले.
परंतु, नंतर हेडने सुटलेल्या झेलाचा फायदा घेत आक्रमण केले. त्याने काही चांगले शॉट्स खेळले. स्टीव्ह स्मिथ त्याला दुसऱ्या बाजूने साथ देत होता. त्यांच्यात अर्धशतकी भागीदारीही झाली.
पण अखेर हेडचा अडथळा ९ व्या षटकात वरुण चक्रवर्तीने दूर केला. त्याच्या गोलंदाजीवर हेडला शानदार झेल शुभमन गिलने घेतला. हेड ५ चौकार आणि २ षटकारांसह ३३ चेंडूत ३९ धावांवर बाद झाला.
पण तरी मार्नस लॅबुशेन स्मिथला नंतर चांगली साथ देत होता. त्यांच्यातही चांगली भागीदारी झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सहज १०० धावांचा टप्पा पार केला होता. परंतु, लॅबुशेनला रवींद्र जडेजाने २३ व्या षटकात २९ धावांवर पायचीत करत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला.
मात्र दुसऱ्या बाजूने स्मिथ भक्कमपणे खेळ करत होता. त्याने अर्धशतकही साकारले. त्याला काही काळ जॉस इंग्लिसने साथ दिली, पण त्याला जडेजाने फार वेळ टिकू दिलं नाही. त्याला विराट कोहलीच्या हातून ११ धावांवर माघारी धाडले. काहीवेळाने अर्धशतक करणाऱ्या स्टीव्ह स्मिथनेही विकेट गमावली.
३७ व्या षटकात त्याला मोहम्मद शमीने त्रिफळाचीत केले. स्मिथने ९६ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह ७३ धावांची खेळी केली. पाठोपाठ ग्लेन मॅक्सवेलाही अक्षर पटेलने ७ धावांवर त्रिफळाचीत केले.
बेन ड्वारशुई देखील १९ धावा करून बाद झाला. पण या विकेट जात असताना ऍलेक्स कॅरेने दुसऱ्या बाजूने आक्रमण कायम ठेवले होते. त्यानेही अर्धशतक साकारत संघ २५० धावांचा टप्पा पार करेल, याची काळजी घेतली.
पण कॅरेला ४८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर श्रेयस अय्यरने डायरेक्ट थ्रो करत धावबाद केले. कॅरेने ५७ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारासह ६१ धावांची खेळी केली. नंतर नॅथन एलिस १० धावांवर आणि ऍडम झाम्पा ७ धावांवर बाद झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव ४९.३ षटकात २६४ धावांवर संपला.
भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.