सर्वांत महान गोष्ट
esakal March 04, 2025 12:45 PM

प्रश्न - सद्गुरू, एखाद्या व्यक्तीला या जगासाठी करता येण्यासारखी सर्वांत महान गोष्ट कोणती आहे?

सद्गुरू - या जगासाठी तुम्हाला करता येण्यासारखी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे सेवा किंवा आध्यात्मिक शिकवण नाही. या जगासाठी तुम्हाला करता येण्यासारखी सर्वांत महान गोष्ट म्हणजे तुम्ही एक आनंदी व्यक्ती असणे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी तुम्हाला करता येण्यासारखी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे तुम्ही एक आनंदी व्यक्ती आहात.

तुम्हाला कशा प्रकारच्या लोकांसोबत काम करायला आवडेल? तुम्हाला कोणत्या प्रकारच्या लोकांसोबत राहायला आवडेल? दुःखी लोकांसोबत की आनंदी लोकांसोबत?

तर, या जगातील कोणत्याही व्यक्तीसाठी तुम्ही करू शकाल अशी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे, या जगाला तुम्ही देऊ शकाल अशी सर्वात महान गोष्ट म्हणजे एक आनंदी व्यक्ती असणे. मग तुम्ही दुःखी का होत आहात? प्रत्येकाला आनंदी व्हायचे असते. त्यांची निवड आनंदी होण्याची असते; पण ते दुःखी झाले आहेत, कारण ते नकळतपणे दुःख निवडत आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य नकळतपणे घडत आहे.

कृपया याकडे पाहा, चोवीस तासांच्या कालावधीत, तुम्ही कोण आहात याची खरोखर जाणीव ठेवत आहात असे किती क्षण आहेत? खूप कमी, नाही का? तर तुमचे संपूर्ण आयुष्य नकळतपणे घडत आहे. आणि तुमच्या आजूबाजूचे बहुतेक लोक तसेही दुखी आहेत. तर, ही एक लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये बहुमताचे राज्य असते.

जेव्हा हे नकळतपणे घडते, तेव्हा तुमचे संपूर्ण जीवन हे एक अपघाती जीवन बनते. ते अपघाती असते, तेव्हा तुमच्या आजूबाजूची परिस्थिती काहीही असो, तुम्हीही तसेच बनता. जेव्हा तुम्ही एक अपघात असता, तेव्हा कोणत्याही क्षणी तुम्ही एक आपत्ती बनू शकता.

तुम्ही इथे काहीही घेऊन आला नाहीत. या सर्व गोष्टी, तुमची ओळख, तुमचे नाव, तुमचे कपडे, तुमचे देव, तुमच्या श्रद्धा, तुमचे स्वर्ग, नरक, हे सर्व तुम्ही वाटेत गोळा करत आला आहात. तुम्हाला माहीत असलेल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला शिकवल्या गेल्या आहेत, तुमचे देव आणि राक्षस यासहित - सर्वकाही. तुम्ही ते फक्त वाटेत गोळा केलेले आहे.

तुम्ही निघून जाल, तेव्हा तुम्हाला रिकाम्या हातानेच जावे लागेल. म्हणून तुम्ही काहीही न घेता आला आहात, तर इथे जे काही घडत आहे, त्यात तुम्ही फायद्यात आहात. नाही का? म्हणून तुम्ही नेहमी आनंदी असले पाहिजे.

तुम्ही तुमचे आयुष्य असे जगत आहात, की जणू तुम्ही इथे एका मोठ्या गुंतवणुकीसह आला आहात. तुम्ही कोणत्याही गुंतवणुकीसह आला नाहीत. तुम्ही काहीही न घेता आला आहात, म्हणून तुमच्या आयुष्यात काहीही घडत असले, तरी तुम्ही नेहमी फायद्यात आहात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.