फळे की फळांचा रस?
esakal March 04, 2025 12:45 PM

- डॉ. मृदुल देशपांडे, MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट

आरोग्य आणि पोषणाच्या दृष्टीने फळांचे महत्त्व आहे. मात्र, फळे संपूर्ण खावी की त्यांचा रस प्यावा, हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. फंक्शनल मेडिसिनच्या दृष्टिकोनातून याचे उत्तर स्पष्ट आहे : संपूर्ण फळे खाणे अधिक फायदेशीर ठरते.

फायबर आणि फायदे

फळे संपूर्ण स्वरूपात खाल्ल्यास त्यातील फायबर आपल्याला मिळतात, जे पचनक्रियेस मदत करतात, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात आणि पचनसंस्थेसाठी उपयुक्त ठरतात. दुसरीकडे, रस काढताना हा फायबर नष्ट होतो. शिवाय, रस काढताना आपण एकाच वेळी ३-४ फळे वापरतो. त्याला High Glycemic Load म्हणतात.

परिणामी, रस प्यायल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते, ज्यामुळे लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिकार आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजेच, NAFLD (Non Alcoholic Fatty liver disease) ही समस्या फळांच्या ज्यूसने होते.

फळे आणि नैसर्गिक साखर

फळांमध्ये नैसर्गिक साखर आहे असे आपल्याला वाटते; पण आपल्या शरीराला ती साखर नैसर्गिक की रिफाइंड आहे हे कळत नाही. ते तशीच प्रकिया करते जशी बाकी सर्व साखरेची केली जाते. म्हणजे, इन्शुलिन रिस्पॉन्स पटकन येतो. परिणामी ब्लड शुगर वाढते. त्यामुळे, कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ली पाहिजे.

अगदी संपूर्ण फळेही अति प्रमाणात खाल्ल्यास त्यातील साखर शरीरावर परिणाम करू शकते, विशेषतः मधुमेह, इन्शुलिन प्रतिकार इत्यादी. म्हणूनच, दिवसाला जास्तीत जास्त एक-दोन संपूर्ण फळांचा आहारात समावेश करणे योग्य ठरेल.

हंगामी व स्थानिक फळे खाणे हे योग्य आहे, कारण ती शरीराच्या हवामानानुसार आवश्यक असलेले पोषकतत्त्व पुरवतात. स्थानिक फळे ताजी, चवदार आणि अधिक पौष्टिक असतात, कारण त्यांचा दीर्घ साठवणूक कालावधी नसतो. आयात केलेली फळे अनेकदा दीर्घकाळ टिकवण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केली जातात, त्यामुळे त्यांचे पोषणमूल्य तुलनेत कमी असते.

फळे जेवणातच खावीत. उपशीपोटी फळे खाल्ल्याने इन्शुलिन रिस्पॉन्स वाढतो, त्यामुळे जेवणानंतर स्वीटडिश म्हणून काही फळांच्या फोडी खाव्या. शक्य तितका संपूर्ण फळे खाण्यावर भर द्यावा. मात्र, त्याचे प्रमाण योग्य ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. लो-कार्ब फळे म्हणजे ज्याचा Glycemic Index (ज्या पदार्थाने इन्शुलिन स्पाईक खूप होतो) कमी आहे. उदा., डाळिंब, पेअर, पेरू, जांभळे, बेरीज, कलिंगड इत्यादींचा आहारात नक्कीच समावेश करावा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.