विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार सत्तेवर आलं. त्यानंतरच अडीच महिन्यात एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे. धनंजय मुंडे यांच्या रुपाने महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळातील हा पहिला राजीनामा आहे. महाराष्ट्रात सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तीन पक्षांच मिळून महायुती सरकार सत्तेवर आहे. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्री होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. संतोष देशमुख यांची हत्या करण्यापूर्वी त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. खंडणी प्रकरणातून ही हत्या झाली. संतोष देशमुख हे खंडणी वसूल करण्याच्या कामात अडथळा ठरत होते, म्हणून त्यांची हत्या करण्यात आली.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड आहे. शनिवारी सीआयडीने 1800 पानांच आरोपपत्र दाखल केलं. त्यातून सुद्धा हीच बाब समोर आली. वाल्मिक कराडच गुन्ह्यात मुख्य सूत्रधार असल्याच समोर आलं. हा वाल्मिक कराड माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. हा गुन्हा घडला तेव्हापासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. पण सरकारने राजीनामा घेतला नाही. काल संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करतानाचे फोटो समोर आले. अत्यंत क्रूरता या फोटोंमधून दिसून आली. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं सरकारला भाग होतं. त्यांनी तो घेतला.
कोण जागा घेणार?
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यामध्ये यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीत आता धनंजय मुंडे यांची जागा कोण घेणार याची राजकीय वर्तूळात चर्चा सुरू आहे.
दांडगा अनुभव
डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यावेळी छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. यानंतर छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती. आता धनंजय मुंडे यांच्या जागी छगन भुजबळ सक्षम पर्याय आहेत. त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.