What happens if IND vs AUS semifinal is washed out? स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. भारतीय संघाने सलग तीन विजय मिळवून अ गटातून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर ऑस्ट्रेलियाचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले होते आणि इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला होता. ४ गुणांसह ब गटातून दुसऱ्या स्थानावरील संघ म्हणून अंतिम चारमध्ये आले आहेत. पण, ऑस्ट्रेलियाने आयसीसी स्पर्धांमध्ये भारताला नेहमी कडवी टक्कर दिली आहे. त्यात उपांत्य फेरीच्या लढतीसाठी राखीव दिवसच नसल्याने हा सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाईल, हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ हायब्रिड मॉडेलमध्ये होत आणि भारताचे सर्व सामने दुबईत खेळवले जात आहेत. आज यांच्यातील पहिला उपांत्य सामना दुबईमध्ये होईल, तर दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या लाहोरमध्ये होईल. पाकिस्तानमधील काही सामन्यांमध्ये पावसाने धुमाकूळ माजवला होता आणि सामने रद्द करावे लागले होते. पावसामुळे पाकिस्तान आणि बांगलादेश या संघांनाही विजयाशिवाय आपला प्रवास संपवावा लागला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवला आहे. पहिल्या उपांत्य फेरीसाठी बुधवारी (५ मार्च) राखीव दिवस आहे. उद्या होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी गुरुवारी (६ मार्च) राखीव दिवस आहे. अंतिम फेरीसाठी १० मार्च हा राखीव दिवस आहे.
उपांत्य फेरीच्या राखीव दिवशीही निकाल न लागल्यास गटात अव्वल स्थानावर असलेला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य सामना रद्द झाला तर भारताला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल.
अंतिम फेरीचा राखीव दिवस वाया गेला, तर फायनलमधील दोन्ही संघांना संयुक्त जेतेपद दिले जाईल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीच्या सामन्याच्या निकालानंतर अंतिम फेरीचे ठिकाण निश्चित केले जाईल. भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले तर ते दुबईमध्ये होईल. अन्यथा, लाहोर येथे जेतेपदाचा निर्णायक सामना आयोजित करेल.