MK Stalin : लग्न होताच मुले लवकर जन्मास घाला : स्टॅलिन
esakal March 04, 2025 10:45 PM

चेन्नई : केंद्र सरकारच्या मतदारसंघ फेररचनेच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी नव्याने विवाहबद्ध झालेल्या तमिळी जोडप्यांना लवकर मुले जन्माला घालण्याचा अजब सल्ला दिला आहे.

नागपट्टीणम येथे आयोजित एका विवाहसोहळ्याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना स्टॅलिन यांनी ही भूमिका मांडली. ‘‘केंद्र सरकारच्या प्रस्तावित धोरणाबाबत आपण आताच काही भाष्य करू शकत नाही. आपल्या सरकारने कुटुंब नियोजनावर लक्ष केंद्रित केले आणि त्यात यशही मिळाले.

त्यामुळेच आज आपल्यावर ही वेळ ओढविली आहे. त्यामुळेच नव्याने विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांनी लवकर मुलांना जन्मास घालावे आणि त्यांना छानसे तमीळ नाव देखील द्यावे,’’ असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावित मतदारसंघ फेररचनेच्या धोरणाला ‘द्रमुक’ने कडाडून विरोध केला आहे.

भूराजकीय बदल लक्षात घेऊन नव्याने लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची फेरआखणी करण्यात येईल. ‘‘तमिळनाडूसारख्या राज्यांनी कुटुंब नियोजन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केली आणि आपल्यावर ही वेळ आली आहे.

आता २०२६ मध्ये मतदारसंघ फेररचनेची प्रक्रिया पार पडेल तेव्हा त्याचा आपल्याला फटका बसेल. या मतदारसंघ फेररचनेमुळे संसदेमधील दाक्षिणात्य राज्यांचा टक्का घसरू शकतो. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोठा वाटा देऊन आणि लोकसंख्या कमी करून देखील आपल्यावर ही वेळ आली आहे,’’ अशी खंत स्टॅलिन यांनी व्यक्त केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.