सध्या सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेकडे लागून आहे. टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर इंग्लंड, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या संघांचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्ठात आलं. इंग्लंड, बांगलादेश आणि पाकिस्तान या तिन्ही संघांना एकही सामना जिंकता आला नाही. इंग्लंडची विजयाची पाटी कोरीच राहिली. तर पाकिस्तान आणि बांगलादेशला सलग 2 सामने गमवावे लागले. तर तिसरा आणि अंतिम सामना हा पावसामुळे रद्द झाल्याने विजयाचं खातं उघडता आलं नाही.
यजमान आणि गतविजेता पाकिस्तानला या स्पर्धेत लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यानंतर आता पाकिस्तान नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. पाकिस्तान या दौऱ्याची सुरुवात टी 20I मालिकेने करणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. तसेच पाकिस्तानने टी 20I कर्णधार बदलला आहे.
पाकिस्तानने मोहम्मद रिझवान याच्याकडून टी 20I संघाचं कर्णधारपद काढलं आहे. इतकंच नाही, तर त्याला संघात स्थानही दिलं नाही. तसेच बाबर आझम याचाही पत्ता कट करण्यात आला आहे. पाकिस्तानने सलमान अली आगा याची टी 20I कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता नवनियुक्त कर्णधार सलमानचा न्यूझीलंडविरुद्ध चांगलाच कस लागणार आहे.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा
पहिला सामना, 16 मार्च, ख्राईस्टर्चच
दुसरा सामना, 18 मार्च, डुनेडीन, यूनिव्हर्सिटी ओव्हल
तिसरा सामना, 21 मार्च, ऑकलँड
चौथा सामना, 23 मार्च, माउंट मौंगानुई
पाचवा सामना, 26 मार्च, वेलिंग्टन
दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेनंतर उभयसंघात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेचं आयोजन 29 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान करण्यात आलं आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी पाकिस्तान टीम : सलमान अली आगा (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, हारिस रौफ, हसन नवाज, जहंदाद खान, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अली, मोहम्मद हारिस, मुहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसुफ, शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मुकीम आणि उस्मान खान.