सिकंदर शेखकडून 'पंजाब केसरी' चितपट
esakal March 04, 2025 09:45 PM

पौड, ता. ४ : पौड (ता. मुळशी) येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने पंजाब केसरी उमेश मथुरा याला चितपट करत ‘श्री मल्लिकार्जुन कुस्ती दंगल २०२५’चा किताब पटकविला.
महाशिवरात्रीनिमित्त या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते. कुस्त्या पाहण्यासाठी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. काही कुस्त्या महिलांच्या हस्तेही लावण्यात आल्या. पहिलवान अमित पिंगळे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी कै. धनंजय तुकाराम दाभाडे यांच्या स्मरणार्थ मुळशी तालुका काँग्रेसचे समन्वयक मधुर दाभाडे व अमित पिंगळे यांच्याकडून पाच लाख रुपये व चांदीची गदा, असे बक्षिस होते. या कुस्तीत सिकंदर शेख याने उमेश मथुरा याला अस्मान दाखवीत हे बक्षिस पटकावले. त्याचप्रमाणे पृथ्वीराज पाटील याने प्रकाश बनकर याला धुळ चारत विजय मिळविला. रविराज चव्हाण याने कालिचरण सोलनकर याला चितपट केले. राहुल सुळ याच्यावर मात करीत समीर शेख विजयी झाला. अनिकेत मांगडे याने शुभम कोळेकर याच्यावर मात केली. ओम भरणे याला पाडून चैतन्य पिंगळे विजयी झाला. तर, कुस्तीचे प्रमुख आकर्षण असलेल्या महिलांच्या लढतीत सोनाली मंडलिक हिने प्रतीक्षा बागडी हिच्यावर मात केली. इतर ७५ प्रेक्षणीय कुस्त्याही अटीतटीच्या पाहायला मिळाल्या.
यावेळी आमदार शंकर मांडेकर, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ तालीमचे अध्यक्ष गोविंद आंग्रे, तुषार खरात (आदर्श सरपंच), उमेश गावडे (उद्योगरत्न), विक्रम क्षीरसागर (खेलरत्न), रवी कुंभार (समाज्जोनती) यांचा विशेष सन्मान केला.
या स्पर्धेसाठी माजी सभापती कोमल वाशिवले, मधूर दाभाडे, विश्वास हरगुले, गोविंद आंग्रे, युवा नेते अमोल शिंदे, उद्योजक सुधीर कर्नाटकी, नरेंद्र मारणे, विनायक मखी, प्रमोद शेलार, रूपाली अमित पिंगळे, सुहास शेंडे, अनिल जाधव, किरण ढोरे, आशुतोष पिंगळे, दत्तात्रेय रूकर, लखन जाधव आदी उपस्थित होते. युवराज केचे व हंगेश्वर धायगुडे यांनी निवेदन केले. पंच म्हणून रोहिदास आमले, विठ्ठल मोहोळ, संजय दाभाडे, अमित म्हस्के, विक्रम पवळे, नीलेश मारणे यांनी काम पाहिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.