चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा प्रवास संपुष्टात आला आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. खरं तर या मैदानावर 250 धावांचा पल्ला गाठणं कठीण होतं. याबाबत सर्वांनात माहिती होतं. ऑस्ट्रेलियाने सावध आणि चिवट खेळी करत धावसंख्या 264 पर्यंत पोहोचवली. भारतासमोर विजयासाठी 265 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारतासाठी खरं तर खूपच कठीण होतं. त्यामुळे भारत हे आव्हान गाठेल की नाही याबाबत शंका होती. भारताने सुरुवात चांगली केली. त्यात रोहित शर्माला दोन जीवदान मिळाले. पण त्या संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरला. शुबमन गिल 8 धावा करून बाद झाल्यानंतर रोहितकडून अपेक्षा होत्या. पण रोहित शर्मा 28 धावा करून बाद झाला आणि टीम इंडियावर दबाव वाढला. पण विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलने डाव पुढे नेला. दोघांनी मिळून 34 धावा जोडल्या. विराट कोहली आणि केएल राहुलने 47 धावांची भागीदारी केली. विराट कोहली 84 धावा करून बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि हार्दिक पांड्याने विजयाच्या वेशीवर आणून सोडलं. पण या पराभवाची ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने वेगळंच कारण सांगितलं.
स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, मला वाटले की गोलंदाजांनी खरोखर चांगले काम केले, त्यांनी संपूर्ण खेळात खूप मेहनत घेतली, फिरकी गोलंदाजांनी खेळाचा गाडा खोलवर नेला. आम्हाला कदाचित काही अधिक धावा मिळू शकल्या असत्या. महत्त्वाच्या वेळी आम्ही काही विकेट गमावल्या. जर आम्ही 280+ धावा केल्या असत्या तर परिस्थिती वेगळी असती.आम्ही इंग्लंडविरुद्ध अपवादात्मकपणे चांगले खेळलो.’
ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास जर तरचा होता. ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीत इंग्लंडला पराभूत केलं होतं. 300 हून अधिक धावांचं आव्हान गाठत आपला हेतू स्पष्ट केला होता. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं उपांत्य फेरीचं गणित जर तर वर आलं होतं. पण अफगाणिस्तानविरुद्धचा सामनाही पावसामुळे रद्द झाला आणि चार गुणांसह उपांत्य फेरी गाठली. पण गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असल्याने भारताशी सामना करावा लागला.