चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात स्थान मिळवलं आहे. मंगळवारी (४ मार्च) दुबईत झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्सने पराभूत करत सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली.
यापूर्वी भारताने २०१३ आणि २०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही स्थान मिळवले होते. २०१३ मध्ये भारत विजयी झाला होता, तर २०१७ मध्ये उपविजेता होता. आता १२ वर्षांनी पुन्हा विजेतेपद मिळवण्याकडे भारताने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
भारतासमोर ऑस्ट्रेलियाने विजयासाठी २६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग भारताने ४८.१ षटकात ६ विकेट्स गमावत पूर्ण केले. भारताकडून अर्धशतकी खेळी केली. त्याला श्रेयस अय्यरचीही चांगली साथ मिळाली.
दरम्यान, आयसीसी वनडे स्पर्धांमध्ये बाद फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला हा सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग आहे. आपलाच २०११ वर्ल्ड कपमधील विक्रम मागे टाकला आहे. याआधी २०११ वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताने २६१ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध पार केले होते.
भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली होती. रोहितने आक्रमक खेळ सुरुवातीचा केला होता. पण शुभमन गिल पाचव्या षटकात ८ धावांवर बेन ड्वारशुईच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याच्यापाठोपाठ ८ व्या षटकात रोहित शर्माही २९ चेंडूत २८ धावा करून माघारी परतला. त्याला कुपर कोनोलीने पायचीत केले.
यानंतर मात्र विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी एकेरी-दुहेरी धावांबरोबरच खराब चेंडूवर चेंडू सीमापार करताना धावफलक हलता राहिल याची काळजी घेतली. या दोघांनी ९१ धावांची भागीदारीही केली. यादरम्यान विराटने अर्धशतक पूर्ण केले.
पण २७ व्या षटकात श्रेयसला ऍडम झाम्पाने त्रिफळाचीत करत भागीदारी तोडली. श्रेयस ६२ चेंडूत ४५ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराटला काही वेळ अक्षर पटेलने साथ दिली. पण अक्षरला ३५ व्या षटकात नॅथन एलिसने २७ धावांवर त्रिफळाचीत केले.
पण तरी एक बाजू विराटने सांभाळली होती. त्याला केएल राहुल साथही देत होता. त्यामुळे विराट आणखी एक शतक करेल, असं दिसत होतं. परंतु, याचवेळी माशी शिंकली विराट ४३ व्या षटकात झाम्पाच्या गोलंदाजीवर बेन ड्वारशुईकडे झेल देत बाद झाला. विराटने ९८ चेंडूत ५ चौकारांसह ८४ धावांची खेळी केली.
विराट बाद झाल्यानंतर केएल राहुलला हार्दिक पांड्याने साथ दिली होती. पण विजयासाठी ६ धावांची गरज असताना पांड्या २४ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. पण अखेर केएल राहुलने ४९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारत भारताचा विजय पक्का केला. केएल राहुलने ३४ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. रवींद्र जडेजा २ धावांवर नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ऍडम झाम्पा आणि नॅथन एलिस यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. बेन ड्वारशुई आणि कुपर कोनोली यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पुर्वी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४९.३ षटकात सर्वबाद २६४ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथने ९६ चेंडूत सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. तसेच ऍलेक्स कॅरेने ५७ चेंडूत ६१ धावा केल्या. या दोघांशिवाय ट्रॅव्हिस हेडने ३९ आणि मार्नस लॅबुशेनने २९ धावा केल्या. या चौघांनीच २० धावांचा टप्पा पार केला. बाकी कोणी खास काही करू शकले नाहीत.
भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.