Water Supply : पुण्यात अघोषित पाणी कपात; विविध भागात पाणी पुरवठ्याची वेळ एक ते दीड तासाने केली कमी
esakal March 05, 2025 04:45 AM

पुणे - कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहरासाठी पाणी कमी पडू दिले जाणार नाही, पाणी कपात लागू होणार नाही अशी घोषणा केली जात आहे. पण प्रत्यक्षात शहराच्या विविध भागात पाणी पुरवठ्याची वेळ एका ते दीड तासाने कमी करण्यात आली आहे.

अनेक भागात पूर्णवेळ पाणी असले तरी त्याला पुरेसा दाब नसल्याने टाक्या भरत नाहीत अशी अवस्था आहे. त्यामुळे कडक उन्हाळा सुरु होण्याच्या पूर्वीच महापालिकेने अघोषित पाणी कपात सुरु केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यासंदर्भात भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केली असून, त्वरित पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. कोथरूड परिसरात विशेषतः एरंडवणे भागात अपुऱ्या व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. रोज सकाळी ९ वाजता पाणी जाते, पण गेल्या काही दिवसांपासून आठ वाजताच पाणी जात आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर त्यांनी पर्वती जलकेंद्रातूनच कमी पाणी येत असल्याचे सांगितले आहे. पर्वती जलकेंद्रातून प्रति तास ४१०० क्यूबिक मीटर पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे, पण सध्या तो ३८०० क्यूबिक मीटर प्रतितास पाणी मिळत आहे. त्यामुळे पाणी लवकर जात आहे, तर काही भागात कमी दाबाने पाणी येत असल्याचे पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी सांगत आहेत.

ही अघोषित पाणी कपात आहे काय याचा आपण त्वरित खुलासा आयुक्तांनी त्वरित करावा, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत काही माहिती देण्यात आली असल्यास ती देखील जाहीर करावी अशी खर्डेकर यांनी केली आहे. अन्यथा महापालिकेच्या य कारभाराविरोधात हांडा मोर्चा काढला जाईल असा इशारा दिला.

गोखलेनगरमधील नागरिकही त्रस्त

कोथरूड परिसरात पाणी लवकर जात आहे, कमी दाबाने पाणी येत आहे अशीच स्थिती गोखलेनगर, जनवाडी,वडारवाडी या भागातही आहे. गेल्या आठ दिवसांपासून पाणी खूप कमी दाबाने येत आहे. रात्री ८ वाजता पाणी आल्यानंतर रात्री एक पर्यंत पाणी असते, पण पाण्याला दाब नसल्याने टाक्या भरत नाहीत. भरल्या तरी नागरिकांना मध्यरात्रीपर्यंत जागरण करावे लागत आहे.

स्थानिक नागरिक नीलेश तळेगावकर म्हणाले, ‘गेल्या आठ दिवसांपासून हा त्रास होत आहे, त्याबद्दल सर्व स्तरावर तक्रारी करून झाल्या, पण पाणी पुरवठ्यात सुधारणा झालेली नाही. रात्री उशिरापर्यंत पाणी भरत बसावे लागत असल्याने या भागातील नागरिक वैतागले आहे. प्रशासनाने त्वरित पाणी पुरवठा सुरळीत करावा.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.