टीम इंडियाने दुबईत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 11 चेंडू राखून 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाने 48.1 ओव्हरमध्ये 267 धावा केल्या. टीम इंडियाने या विजयसह एकूण पाचव्यांदा तर सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये प्रवेश केला. तर दुसऱ्या बाजूला पराभवासह ऑस्ट्रेलियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आलं. ऑस्ट्रेलिया पराभवासह स्पर्धेतून बाहेर झाली. मात्र त्याचा फटका हा यजमान आणि शेजारी पाकिस्तानला बसला आहे. नक्की काय झालं? हे जाणून घेऊयात.
पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. मात्र टीम इंडियाने या स्पर्धेत सुरक्षिततेच्या कारणामुळे दुबईत आपले सामने खेळले. टीम इंडियाने साखळी फेरीतील 3 आणि उपांत्य असे एकूण 4 सामने दुबईत खेळले. तर आता उपांत्य फेरीतील दुसर्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. हा सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये होणार आहे.
तसेच दुसऱ्या बाजूला टीम इंडिया अंतिम फेरीत पोहचल्याने पाकिस्तानला आर्थिकरित्या नुकसान झालं आहे. जर टीम इंडियाचा उपांत्य फेरीत पराभव झाला असता तर अंतिम फेरीतील सामना हा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणार होता. त्यामुळे यजमान पाकिस्तानचं या सामन्याच्या निकालाकडे लक्ष होतं. मात्र टीम इंडियाने विजय मिळवल्याने आता अंतिम फेरीतील सामना हा दुबईतच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामना हा पाकिस्तानमधील ‘अंतिम’ सामना असणार, हे स्पष्ट झालं आहे. आता न्यूझीलंड विजयी होऊन दुबईचा प्रवास करणार की दक्षिण आफ्रिका किवींना वेलिंग्टनला पाठवणार? हे 5 मार्चला निकालानंतरच स्पष्ट होईल.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), कूपर कॉनोली, ट्रेव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (विकेटकीपर), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झॅम्पा आणि तनवीर संघा.
टीम इंडिया इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.