मुंबई : शतकातील महानायक अमिताभ बच्चन यांनी अनेक दशके चित्रपटसृष्टी गाजवली आहे. दर्जेदार अभिनय, भारदस्त आवाज आणि दमदार संवादफेक ही अमिताभ यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये सर्वांनाच माहीत आहेत. वयाच्या ८२ व्या वर्षीही अमिताभ त्याच उत्साहाने अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. पण अलीकडे प्रकृती त्यांना फारशी साथ देत नसल्याचे दिसून आले आहे. खुद्द अमिताभ यांनीच हा उल्लेख केला आहे.
अमिताभ बच्चन विविध सोशल मीडियावरही सक्रिय असतात. अलीकडेच त्यांनी एक ब्लॉग लिहून स्वत:च्या प्रकृतीबद्दल काही विधाने केली आहेत. वयानुसार येणाऱ्या काही अडचणी आता जाणवू लागल्या आहेत, असे अमिताभ यांनी त्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.
२८ फेब्रुवारी रोजी अमिताभ यांनी एक ब्लॉग लिहिला. यात त्यांनी विविध गोष्टींचा उल्लेख केला. अजूनही अमिताभ यांच्याकडे सातत्याने नव्या चित्रपटांसाठी कथा येत असतात. 'कोणता चित्रपट करायचा आणि नम्रपणे नकार कसा द्यायचा, हे ठरवणे अजूनही कठीण जात आहे' असे अमिताभ यांनी लिहिले आहे.
वयपरत्वे येणाऱ्या अडचणींचाही अमिताभ यांनी उल्लेख केला आहे. 'तुमचं वय जसजसं वाढत जातं, तशा वेगवेगळ्या अडचणीही निर्माण होऊ लागतात. केवळ संवादांचे पाठांतर करण्यातच नव्हे, तर प्रकृतीविषयक इतरही समस्या भेडसावू लागतात' असे अमिताभ लिहितात.
इतकी दशके कार्यरत असलेले अमिताभ अजूनही त्यांच्या कामाविषयी कमालीचे संवेदनशील आहेत. दिवसभर काम करून घरी परतल्यानंतरही त्यांच्या डोक्यात झालेल्या कामाचे विचार घोळत असतात. यासंदर्भात अमिताभ यांनी लिहिले, की अनेकदा मी दिग्दर्शकाला मध्यरात्रीही फोन करून झालेल्या चुका दुरुस्त करता येतील का, याची विचारणा करतो.
सध्या अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती'चे सूत्रसंचालन करत आहेत. याशिवाय 'रामायण' या आगामी चित्रपटात ते रणबीर कपूरसह महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.