अभिजित देशमुख
कल्याण : कल्याणच्या चिकणघर परिसररातील नव एव्हरेस्ट सोसायटीमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. साधारण महिनाभरापासून सोसायटीत हि समस्या असून केडीएमसी प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे भाजपकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
च्या चिकणघर परिसरात असलेल्या नव एव्हरेस्ट सोसायटीमध्ये एकूण ७५ सदनिका आहेत. या सोसायटीमध्ये गेल्या महिनाभरापासून या सोसायटीला दूषित पाणी पुरवठा होत आहे. सोसायटीत पिवळ्या रंगाचे गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांनी याबाबत महापालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
दूषित पाण्याने नागरिक पडताय आजारी
केडीएमसीने पंधरा दिवसांपूर्वी पाण्याचे नमुने घेतले. मात्र त्याबाबतचा अहवाल अद्याप आला नसल्याचे सांगितले. या दूषित पाणीपुरवठामुळे या इमारतीमधील रहिवाशांना, लहान मुलांना, वृद्ध नागरिकांना उलट्या, टायफाईड, ताप, डायरिया या सारखे आजार झाले आहेत. त्यामुळे दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा नागरिक याबाबत केडीएमसीकडे तक्रार करूनही दुर्लक्ष करत असल्याने दाद कुणाकडे मागायची असा सवाल नागरिक करत आहेत.
भाजपकडून आंदोलनाचा इशारा
केडीएमसीकडे तक्रार करून देखील दूषित पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान याबाबत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून भाजपचे शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी केडीएमसीने दूषित पाणीपुरवठाची समस्या येत्या दोन दिवसात सोडवले नाही; तर भाजपतर्फे उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा केडीएमसीला दिला आहे.