भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना रोमांचक होणार यात काही शंका नाही. कारण कांगारू आयसीसी चॅम्पियन्स स्पर्धेत सहजासहजी हार मानत नाही. त्यामुळे सामना कधीही पालटू शकतो याची जाणीव क्रीडाप्रेमींना आहे. मागच्या तीन आयसीसी स्पर्धेत ट्रेव्हिस हेड हा भारतासाठी डोकेदुखी ठरला. पण या सामन्यात त्याला दोनदा जीवदान मिळालं. त्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला आणि 33 चेंडूत 39 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 5 चौकार आणि दोन षटकार मारले. खेळपट्टीवर त्याचा जम बसल्याचं पाहून कर्णधार रोहित शर्माने वरुण चक्रवर्तीकडे चेंडू सोपवला. त्याने दुसऱ्या चेंडूवर ट्रेव्हिस हेडची विकेट काढली. पण या विकेटवरून आता वादाला फोडणी मिळाली आहे. ट्रेव्हिस हेडने लाँग ऑफच्या दिशेने उत्तुंग फटका मारला. हा फटका मारताना अंदाज चुकला आणि चेंडू वर चढला. शुबमन गिलने या संधीचं सोनं केलं आणि धावत येत अप्रतिम झेल पकडला.
शुबमन गिलने ट्रेव्हिस हेडचा पकडलेला झेल एकदम बरोबर होता. पण गिलने त्याचा आनंद खूपच लवकर साजरा केला असं म्हणावं लागेल. शुबमन गिलने झेल पकडला आणि लगेच मैदानावर चेंडू फेकून दिला. पण ट्रेव्हिस हेड खेळ भावना दाखवत मैदान सोडून निघून गेला. पण पंचांनी शुबमन गिलला जवळ बोलवून आपली नाराजी व्यक्त केली. रिपोर्टनुसार, पंचांनी शुबमन गिलला सक्त ताकीद दिली. पण सुरुवातीला ही बाब लक्षात आली नाही. पण मात्र त्यानंतर सोशल मीडियावर वेगाने याबाबत खरं काय ते समोर आलं.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, तनवीर संघा.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.