धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न देता थेट प्रसारमाध्यमांना देत सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्या (ता. ५) हक्कभंग आणणार असल्याचा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.
संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली, याची गृहखात्याकडे माहिती नव्हती का, असा संतप्त सवाल काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला.
पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाचे संकेत मोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय बंगल्यावर जाऊन रात्री चर्चा केली व त्यातून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. सरकारला या प्रकरणाची सर्व माहिती होती पण ती लपविली.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोटी माहिती देऊन सभागृह व जनतेची दिशाभूल केली. सरपंच हत्येमध्ये वाल्मीक कराड व त्याचे सहकारी आरोपी आहेत पण सरकारने या प्रकरणातील माहिती लपवल्याने त्यांनाही सहआरोपी केले पाहिजे, अशी मागणी सभागृहात करु.
औरंगजेबाच्या मुद्द्यावर पटोले म्हणाले की, सभागृह चालवणे ही सरकारची जबाबदारी आहे पण तेच बहुमताच्या जोरावर गोंधळ घालून सभागृह बंद पाडत आहेत.