पुणे - शहरातील बिबवेवाडी परिसरातील एका हिरे व्यापाऱ्याचे दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मंगळवारी दहा ते बारा संशयितांची चौकशी करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत व्यापाऱ्याचा ठावठिकाणा लागलेला नव्हता.
याबाबत हिरे व्यापाऱ्याच्या पत्नीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी आणि त्याचे कुटुंबीय बिबवेवाडी परिसरातील एका सोसायटीत राहतात. सोमवारी सायंकाळी व्यापाऱ्याने पत्नीला काही कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगितले.
त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने व्यापाऱ्याच्या मोबाईलवरूनच पत्नीच्या मोबाईलवर संपर्क साधला. ‘मी तुमच्या पतीचे अपहरण केले आहे, दोन कोटी रुपये तयार ठेवा,’ असे सांगून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पत्नीने पोलिस नियंत्रण कक्षात माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
दुचाकी आढळली, मोबाइल बंद -
तपासादरम्यान, व्यापारी सोमवारी सायंकाळी नवले पूल परिसरात असल्याचे समोर आले आहे. या भागात व्यापाऱ्याची दुचाकी आढळून आली असून, मोबाइल बंद आहे. या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येत आहेत. पोलिसांनी दिवसभरात दहा ते बारा संशयितांची चौकशी केली. या व्यापाऱ्याने काही जणांकडून पैसे घेतले आहेत. मागील वर्षभरात व्यापारी कामानिमित्त तीन वेळा दुबईला जाऊन आला आहे. या प्रकरणात सर्व शक्यता तपासण्यात येत असल्याचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले.