Rohit Sharma: धोनी-कोहली सोडा! रोहित ICC स्पर्धांमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच कर्णधार
esakal March 05, 2025 04:45 AM

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अंतिम सामना खेळला होता.

मंगळवारी (४ मार्च) भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्सने पराभूत केले. यामुळे भारताने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. पण यासोबतच कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावावर एक विश्वविक्रम झाला आहे.

रोहित आयसीसीच्या सर्व स्पर्धांच्या अंतिम सामन्यात खेळणारा जगातील पहिलाच कर्णधार ठरला आहे. त्याने कर्णधार म्हणून कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, वनडे वर्ल्ड कप, टी२० वर्ल्ड कप या आयसीसी स्पर्धांचे कर्णधार म्हणून अंतिम सामने खेळले आहेत.

यापूर्वी रोहितच्या नेतृत्वात भारताने कसोटी अजिंक्यपद २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता, ज्यात भारतीय संघ उपविजेता राहिला होता. त्यानंतर भारताने रोहितच्याच नेतृत्वात २०२३ वनडे वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळला होता. या अंतिम सामन्यातही भारत उपविजेता होता. या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं होतं.

त्यानंतर भारतीय संघ रोहितच्या नेतृत्वात टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना खेळला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विजेतेपद जिंकले. कर्णधार म्हणून रोहितचे हे पहिले आयसीसी विजेतेपद ठरले.

आता यानंतर रोहितच्या नेतृत्वात ९ मार्च रोजी भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. ५ मार्च रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी भारतीय संघ दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळेल. भारतीय संघ या स्पर्धेत अद्याप अपराजित आहे.

उपांत्य सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४९.३ षटकात २६४ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने २६५ धावांचे लक्ष्य ४८.१ षटकात ६ विकेट्स गमावत पूर्ण केले. त्यामुळे भारताने हा सामना सहज जिंकला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.