सुरवातीलाच सांगतो, मी एक सिंह आहे. मी गुजरातमध्ये सासन गीर येथे मजा मां राहातो. इथेच माझा जन्म झाला. आशियाई सिंह म्हणून एक सिंहांची प्रजात आहे, मी त्या प्रजातीच्या अखिल भारतीय मंडळाचा कार्यवाह आहे. माझे नाव काय हे विचारु नका. वन अधिकारी मला ‘जी-९’ या नावाने ओळखतात. हे काय नाव झाले? नॉन्सेन्स. माझे नाव सिंह हेच. सिर्फ नामही काफी है
गुजरातीत मला सेर असे म्हणतात. ‘सेर नही बाबा, शेर शेर!’ अशी एका सिंहली गाण्यात ओळही आहे. (संदर्भ : माणसांच्या एका चित्रपटात ‘पवन करे सोर’ असे सुनील दत्तने म्हटल्यावर नूतन त्याला अरे बाबा, सोर नही, शोर…शोर असे शिकवते. होडीतले गाणे आहे. ती चाल ओरिजिनली आमचीच!) सिंहली ही आमची भाषा, पण पुढे श्रीलंकेची झाली. असो.
वास्तविक मला अरण्यवाचन कथा लिहिण्याचा अतिशय कंटाळा आहे. वाचण्याचा तर त्याहून. खरे सांगायचे तर आम्हा सिंहलोकांना सगळ्याचाच कंटाळा आहे. झोप ही आमची अत्यंत आवडती कृती आहे. जातीच्या सिंहाचे तीन-चतुर्थांश जीवन हे झोपेत जाते, असे वन्यजीवतज्ज्ञ सांगतात. उरलेले आयते खाण्यात! मला तर कधी कधी खाण्याचाही कंटाळा येतो. खातानाच मी झोपी जातो. किंवा झोपेत खातो. लेकाचे दुर्बिणीने सिंहांच्या झोपासुध्दा बघत बसतात. माणसाने किती निरुद्योगी असावे, याला काही लिमिट?
सिंह हा अत्यंत आळशी प्राणी आहे, अशी एक समजूत आहे. ती खरी आहे. आळशीपणाचा सिंहांना अभिमान वाटतो. झोप हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो आम्ही मिळवणारच, अशी डरकाळी एका सिंहाने काही वर्षांपूर्वी झोपेतच मारली होती. तेव्हापासून सासन गीर येथे सिंहांच्या सुखनैव झोपेची व्यवस्था झाली.
सिंह बसल्याजागी आयत्या शिकारीवर ताव मारतो. सिंहीण त्याच्या पोटापाण्याची तजवीज करते, हेदेखील खरेच आहे. कोण उठून हरणांच्या मागे येड्यासारखे धावेल? दिसले हरीण, घे धाव हे काही योग्य वर्तन नाही. जंगलच्या राजाला तर ते बिलकुल शोभत नाही. तथापि, काही माणसे आम्हाला धड झोपू देत नाहीत, खाऊही देत नाहीत. सारखे आपले क्यामेरे घेऊन आमच्या मागे लागतात. एक दाढीधारी गृहस्थ गॉगल लावून, जाकिटबिकिट घालून नेहमी आमच्या अभयारण्यात येतात. मी झोपलेला असताना समोर जीप लावून एकटक बघत बसतात. अतिशय संकोचल्यासारखे होते. तुम्हाला कोणी असे एकटक बघितले तर चालेल का? असे मी एकदा त्यांना विचारलेही, तर ते म्हणाले, ‘चालसे’ मी नाद सोडला…
परवा असेच घडले. सदरील गृहस्थ वन्यजीव दिनाच्या निमित्ताने गीर अभयारण्यात आले. जीपमधून फिरले. त्यांच्या जाकिटावर पुढील आणि मागील बाजूस सिंहाचा पंजा छापलेला होता. मला जाकिट आवडले, हे मान्य करतो. त्यांनी आम्हा काही सिंहांचे फोटो काढले. ख्यालीखुशाली विचारली. माणसे आल्यागेल्यासमोर ढोकळा, फाफडा पुढे करतात. मी काय देणार? ‘घ्या ससा थोडा थोडा’ असे कसे म्हणणार?
‘तबियत तो ठीक छे ने?’ त्यांनी विचारले.
‘चोक्कस,’ मी म्हणालो. पण त्यांचे हे तब्बेत विचारणे मला थोडे संशयास्पद वाटले.
सदरील गृहस्थ आदल्या दिवशीच जामनगरला ‘वनतारा’ ला भेट देऊन आले होते. ‘वनतारा’ हे जखमी, आजारी वन्यप्राण्यांचे आलिशान आरोग्यकेंद्र आहे, अशी माहिती मला ‘जी-७’ ने दिली. (गीरचा एक अत्यंत भोचक सिंह आहे. असो.)
मी ठणठणीत सिंह आहे हे एक त्यातल्या त्यात बरे आहे!