उद्दिष्टावर लक्ष्य
esakal March 05, 2025 11:45 AM

- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड

उद्दिष्ट आवडीचे असेल आणि त्याला चिकाटीची साथ असल्यास अशक्यप्राय गोष्टीही सहज शक्य होतात. म्हणतात ना ‘जग हे नेहमीच सारखे आणि सोपे नसते.’ प्रत्येकवेळेस आपल्या मनासारखे होईल असे नाही. कधी आपले प्रयत्न तर कधी ना उमगण्याऱ्या गोष्टी त्यात अडथळे आणू अपयश पदरी टाकतात.

अशावेळी मग तो विद्यार्थी, पदवीधर, नोकरी इच्छुक असो सगळे आलेल्या अपयशाचे कारणे शोधण्यात आपला वेळ घालवतात. झाले ते चूक आणि त्याच्या पुनरावृत्ती होऊ नये किंवा झाले ते विसरून पुढचे मार्ग आखायचे आणि नवीन वाट शोधायची हे महत्त्वाचे.

चूक कुणाची आहे, हे मान्य करण्यापेक्षा आपण दुसऱ्यांवर आरोप करायला लागतो हे अनेकदा कामाच्या ठिकाणी अनुभवायला मिळते. शिक्षा फक्त आपल्यालाच मिळेल, अशी अनामिक भीती असते. ईसापनीतीची एक कथा आहे, ‘नेकी कर और दरिया में डाल’ म्हणजे तुम्ही कुणासाठी काही केले आहे म्हणून तो ही तुमच्यासाठी करेल याची अपेक्षा न ठेवता आपले करिअर, अभ्यास कसा व्यवस्थित होईल, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. याचा अर्थ कुणाची मदत करू नये असा होत नाही तर परतीची अपेक्षा ठेवू नये असा होतो.

आपण अनेकदा बातम्यांमध्ये ऐकतो किंवा वाचतो की एखादा खेळाडू किंवा बॉलिवूडची नायक, नायिका, पोलिस सेवेतील कर्मचारी नैराश्यात गेले आणि काही उपचार घेऊन पुन्हा जोमाने परत आलेत तर काहींनी आत्महत्या करून संपवले. यात खूप मोठा हात हा नको त्या गोष्टीवर विचार करण्याचा आहे. त्यामुळे जेवढे लवकर आपण नवीन विचार करू तितक्या लवकर आपला विकास होईल.

पॉल मग्गी लिखित ‘शट अप अँड मूव्ह ऑन’ पुस्तकात त्याने हे प्रकर्षाने सांगितले आहे, शट अप...नसत्या गोष्टींवर वेळ घालू नका... पुढे चला, जर तुम्हाला तुमचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर. प्रेमात पडणे, ब्रेक अप होणे हे सगळे अनुभव तरुण वयात करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी सज्ज करतात.

पालकांनी प्रत्येक अशा गोष्टीवर नाराज न होता, या सगळ्या गोष्टी जेवढ्या लवकर स्वीकारता येतील तेवढे त्यांच्यासाठी आणि मुलांसाठी चांगल्या. पालकनीतीची अशा ठिकाणी कारणमीमांसा न करते आयुष्य पुढे आनंदाने जगायला आणि सत्कारणी लावावे. तरुणांना हे अनुभव करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी उपयोगी पडतात.

थोडक्यात काय तर शर्ट अस्वच्छ झाल्यावर फेकून देण्यापेक्षा आपण दुसरा धुतलेला शर्ट घालतो आणि खराब झालेला धुवायला टाकतो. शीण निघून जाऊन ताजे टवटवीत वाटण्यासाठी आपण दररोज अंघोळ करतो. आपल्या विचाराचे आणि कामाचे ही तसेच आहे. बाह्य कौशल्ये शिकण्याएवढेच महत्त्वाचे आहे या आंतरिक विचारांना सरळ सोपे मार्ग देणे. यशस्वी करिअरसाठी हे ही तितकेच किंबहुना अत्यंत महत्त्वाचे आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.