न्यूझीलंडने मिचेल सँटनर याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेवर 50 धावंनी मात करत उपांत्य फेरीतील सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकसमोर 363 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेला डेव्हिड मिलर याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 312 धावाच करता आल्या.मिलरला शतकी खेळी करुन दक्षिण आफ्रिकेला विजयी करता आलं नाही. मात्र मिलरने या खेळीसह दक्षिण आफ्रिकेलाचा लाजिरवाणा पराभव टाळला आणि न्यूझीलंडला विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत वाट पाहण्यास भाग पाडलं. दक्षिण आफ्रिकेचं या पराभवासह इथेच आव्हान संपुष्ठात आलं. तर आता न्यूझीलंडसमोर फायनलमध्ये टीम इंडियाचं आव्हान असणार आहे. हा सामना रविवारी 9 मार्चला दुबईत होणार आहे.
न्यूझीलंडने या विजयासह दीड दशकांची प्रतिक्षा संपवली. न्यूझीलंडने 2009 नंतर पहिल्यांदा तर एकूण तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. आता अंतिम सामन्यात विजय मिळवत चॅम्पियन्स होण्याची बरोबरची संधी आहे. मात्र कोणती टीम चॅम्पियन्स होते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. टीम इंडियाला या अंतिम सामन्यानिमित्ताने किवींचा धुव्वा उडवत 25 वर्षांपूर्वीचा हिशोब बरोबर करण्याची संधी आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ 2000 नंतर पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये आमनेसामने असणार आहे. त्याआधी न्यूझीलंडने 2000 साली अंतिम सामन्यात टीम इंडियावर मात करत चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती.त्यामुळे आता टीम इंडियाकडे फायनलमध्ये विजय मिळवून 25 वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता करण्याची संधी आहे. टीम इंडियाने यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेतून बाहेर केलं आणि 2017 फायनलचा हिशोब बरोबर केला. त्यानंतर उपांत्य फेरीत कांगारुंना लोळवत वनडे वर्ल्ड कप 2023 चा वचपा काढला. त्यामुळे आता टीम इंडियाने न्यूझीलंडच्या 2000 सालच्या पराभवाची परतफेड करावी आणि मायदेशी चॅम्पियन्स ट्रॉफी आणावी, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के, डॅरिल मिशेल, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन आणि जेकब डफी.