Career opportunities : डेटा विश्लेषणात वाढतील करिअरच्या संधी; कौशल्य, सराव आणि नवे तंत्र आत्मसात करण्याची गरज
esakal March 06, 2025 04:45 PM

छत्रपती संभाजीनगर : डिजिटल युगात डेटा ही नवी संपत्ती मानली जाते. विविध उद्योग आणि क्षेत्रांमध्ये डेटा विश्लेषणाच्या मदतीने व्यावसायिक निर्णय घेतले जातात; तसेच संशोधनातही डेटा ॲनालिसिसचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) यांसारख्या तंत्रज्ञानामुळे डेटा विश्लेषण अधिक प्रभावी होत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील संधी वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डेटा विश्लेषण म्हणजे मोठ्या प्रमाणावर असलेल्या डेटा संचांमधून उपयोगी माहिती मिळवणे, त्याचे विश्लेषण करणे आणि त्यातून अर्थपूर्ण निष्कर्ष काढणे कंपन्या ग्राहकांची वर्तनशैली समजून घेण्यासाठी, विक्री वाढविण्यासाठी, धोरणे आखण्यासाठी आणि उत्पादन क्षमता सुधारण्यासाठी डेटा विश्लेषणाचा उपयोग करतात.

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे डेटा विश्लेषण क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग यांसारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर डेटा प्रक्रिया करता येते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने स्वयंचलित विश्लेषण शक्य होते. त्यामुळे व्यावसायिक निर्णय अधिक जलद आणि अचूक केले जाऊ शकतात.

सॉफ्टवेअर आणि साधने

पाइथन, आर, एसक्यूएल या महत्त्वाच्या प्रोग्रामिंग भाषा तसेच एक्सेल, टेबल्यू आणि पॉवर बीआय, अपाचे स्पार्क, हडूप यासोबतच बिग डेटासाठी क्लाऊड कॉम्प्युटिंगमधील साधनांचे ज्ञान व कौशल्ये आत्मसात करावी लागतात.

अभ्यासक्रम

शहरात डेटा सायन्स, संख्याशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर कोर्सेस विविध महाविद्यालये तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नायलेट, विद्यापीठातील विभागात आहे. आयआयटी आणि आयआयएम यांसारख्या संस्थांमध्ये डेटाशास्त्र विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम चार महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत उपलब्ध आहेत.

कोर्सेस, एडएक्स, स्वयंम, डेटाकॅम्प, स्वयंम आणि कॅगल यांसारख्या प्लॅटफॉर्मवर मोफत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत; तसेच ऑनलाइन कोर्सेसव्यतिरिक्त अनेक कंपन्या इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपच्या माध्यमातून डेटा विश्लेषण क्षेत्रात प्रवेश करण्याची संधी देतात. यासंदर्भातील टेक्नॉलॉजी कॉन्फरन्स, हॅण्डऑन वर्कशॉप आणि हॅकाथॉनमध्ये सहभागी होऊन या क्षेत्रातील कौशल्ये वाढविता येतात.

अशा आहेत संधी

  • डेटा ॲनालिस्ट ः डेटा संकलन, विश्लेषण आणि अहवाल तयार करणे. यात कोणताही पदवीधर करिअर करू शकतो.

  • डेटा सायन्टिस्ट ः जटिल गणिती मॉडेल्स आणि मशीन लर्निंगच्या मदतीने माहितीचा सखोल अभ्यास करणे यासाठी गणित, संख्याशास्त्र किंवा संगणक शास्त्रातील पदवीधरांना ही संधी मिळू शकते.

  • बिझनेस इंटेलिजंट ॲनालिस्ट ः व्यवसाय धोरणे आखण्यासाठी डेटा विश्लेषण करणे. यात व्यावसायिक पदवी शिक्षणाच्या विद्यार्थ्यांनी संधी आहेत.

  • डेटा अभियंता ः डेटा संरचना तयार करणे आणि मोठ्या प्रमाणावर डेटा व्यवस्थापन करणे. संगणक विषयातील पदवी आवश्यक असते.

  • मशीन लर्निंग अभियंता ः कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग मॉडेल्स विकसित करणे.

आवश्यक कौशल्ये

  • डेटा विश्लेषणामध्ये मूलभूत संख्याशास्त्राचे ज्ञान गरजेचे आहे.

  • प्रोग्रामिंग भाषा पाइथन, आर, एसक्यूएलचे ज्ञान आवश्यक आहे.

  • डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी टॅबल्यू, पॉवर-बीआयच्या मदतीने डेटा सादर करण्याचे कौशल्य गरजेचे आहे.

  • मशीन लर्निंग ए-आय यांच्या मूलभूत संकल्पनांचे ज्ञान असावे.

  • डेटाबेस हॅण्डलिंग तंत्रज्ञानांचा अनुभव असावा.

डेटा विश्लेषणात करिअर करण्यासाठी गणित, सांख्यिकी, प्रोग्रामिंग आणि डेटा व्हिज्युअलायझेशन यांचे ज्ञान गरजेचे आहे. एआयमुळे अनेक नव्या संधी निर्माण होणार आहेत भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रवाहात कौशल्य असणाऱ्यांना डेटा तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रातील संधी वाढतील.

- डॉ. सुनील कावळे, संख्याशास्त्र विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.