Beed News: बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावात अमानुष मारहाणीचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीला निर्घृण मारहाण करतानाचा व्हिडीओ आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे मारहाण करत असलेला व्यक्ती सतीश भोसले आहे अशी माहिती समोर आली आहे. सतीश भोसले भाजप आमदार सुरेश धस यांचा समर्थक असल्याचे देखील बोलले जात आहे. सतीश भोसले हा भाजपा भटक्या विमुक्त चा प्रदेश उपाध्यक्ष आहे. दरम्यान मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सतिश भोसलेनं स्पष्टीकरण दिलं.
सतीश भोसलेने म्हटलं की, जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. तो खूप जुना आहे, किमान दोन अडीच वर्षांपूर्वीचा आहे. त्या व्हिडीओमागची खरी पार्श्वभूमी अशी आहे की, माझा मित्र माऊली खेडकर यांचा मला फोन आला माझ्या घरी प्रॉब्लेम झालाय तर तू जा. मी माऊलीच्या घरी गेलो तेव्हा मला त्यांच्या घरच्यांनी असं सांगितलं की, हा माणूस माझी छेड काढत होता. त्यावेळी मला अत्यंत राग आला. त्या रागाच्या भरात मी त्याला मारलं.
एखाद्याच्या आई-बहिणीची छेड काढल्यानंतर.. जर माणूस समोर गुन्हेगार दिसतोय त्याला कायद्याच्या चौकटीत उभा केला तर न्याय मिळेलच. पण मला त्यावेळी राग आवरला नाही. त्या रागातून मी मारहाण केली होती. एखाद्याच्या आई-बहिणीची छेड निघत असताना डोळ्याने बघत राहत असू तर आपला जगून काही उपयोग नाही असंही सतीश भोसले यानं सांगितलंय.
दरम्यान, आता सतीश भोसलेचा दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सतीश भोसले हा नोटांचे बंडल गाडीच्या बोनटवर टाकताना दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ सोशल माध्यमात व्हायरल केलाय. हा कार्यकर्ता कोण आणि याच्याकडे एवढे पैसे कुठून आले? याची चौकशी करा आणि अटक करा अशी मागणी दमानिया यांनी केलीय.