वडील पोलीस महासंचालक, लेकीला सोन्याच्या तस्करीत अटक; विमानतळावरून पोलीसच घरी सोडायचे
esakal March 06, 2025 06:45 PM

दुबईतून बेकायदेशीरपणे सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली कन्नड अभिनेत्री रन्या राव हिला अटक करण्यात आलीय. तिच्या निवासस्थानीही बुधवारी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छापा टाकला. छाप्यात कोट्यवधींची रोकड आणि सोने जप्त केलंय. सोमवारी रात्री दुबईहून एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानाने केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलेल्या रन्या रावची झडती घेण्यात आली. तेव्हा तिच्याकडे १४.८० किलो सोने असल्याचे आढळून आले. नंतर तिला अटक करण्यात आली.

३२ वर्षीय रन्या राव ही पोलिस महासंचालक (पोलिस गृहनिर्माण महामंडळ) रामचंद्र राव यांची मुलगी आहे. मात्र चार महिन्यांपूर्वी अभिनेत्रीचे लग्न झाल्यापासून हे दोघेही संपर्कात नसल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी डीआरआय अधिकाऱ्यांना दुबईतील सोन्याच्या तस्करीच्या टोळीत एक कन्नड अभिनेत्री सक्रिय असल्याची माहिती मिळाली. दुबईला वारंवार ये-जा करणाऱ्या रन्यावर अधिकारी लक्ष ठेवून होते. गेल्या १५ दिवसांत रन्या राव चार वेळा दुबईला गेली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने उतरल्यानंतर केम्पेगौडा विमानतळावर अभिनेत्रीला अटक करण्यात आली. अभिनेत्री दुबईहून एमिरेट्सच्या विमानात चढल्याची माहिती मिळाल्यानंतर डीआरआयच्या चार अधिकाऱ्यांची एक पथक बंगळूर विमानतळावर तिची वाट पाहत होते. तिला चौकशीसाठी बंगळूर येथील डीआरआय मुख्यालयात नेले आणि नंतर न्यायालयात हजर करण्यात आले. तिला १८ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली.

चिक्कमगळूरची रहिवासी असलेल्या रन्याने २०१४ मध्ये किच्चा सुदीप अभिनीत ‘माणिक्य’ चित्रपटातून सँडलवुडमध्ये (कन्नड चित्रपटसृष्टी) पदार्पण केले. नंतर तिने गोल्डन स्टार गणेशच्या ‘पतकी’ चित्रपटात काम केले. याशिवाय रन्याने तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. अधिकाऱ्यांनी रन्या हिच्या लव्हेल रोडवरील आलिशान फ्लॅटमधून २.०६ कोटींचे सोने आणि २.६७ कोटींची रोकड जप्त केली. फ्लॅटसाठी ती ४.५ लाख रुपये भाडे देत होती, अशी माहिती मिळाली आहे.

पोलिसच सोडायचे घरी

रन्या तिच्या बेल्ट आणि कपड्यांमध्ये लपवलेल्या सोन्याच्या बारांची तस्करी करण्यासाठी डीजीपीच्या नावाचा वापर करत होती. विमानतळावर उतरल्यानंतर पोलिस कर्मचारी तिला घेण्यासाठी येत होते. मग ते तिला घरी नेऊन सोडत, असे अधिकाऱ्यांनी उघड केले.

पोलीस महासंचालक वडिलांची प्रतिक्रिया

रन्या रावच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना तिचे वडील राज्याचे पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांनी आश्चर्य व्यक्त केलं. एखाद्या वडिलांना जे वाटेल तेच मला वाटतं. मलाही माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांवरूनच समजलं आणि यामुळे मला धक्का बसला होता. मला याबाबत काहीच माहिती नव्हती. ती पतीसोबत वेगळी राहत होती. त्यांच्यात कौटुंबिक समस्या असू शकतात. या प्रकाराचा माझ्या करिअरवर काही परिणाम झाला नाहीय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.