मराठी विषयाच्या पेपरची प्रश्नपत्रिका तयार करताना योग्य ती काळजी घेण्यात आलेली नाही. तसेच प्रश्न विचारताना अनेक चुकीचे शब्द वापरण्यात आले.
बेळगाव : मंगळवारी झालेल्या बारावी मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत (12th Marathi Question Papers) अनेक चुका असल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा (Students) गोंधळ झाला आहे. तसेच १४ प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याची माहिती परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनीच दिली.
बारावीच्या परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी (Education Department) परीक्षा अत्यंत कडकपणे घेतली जात आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेले सर्व पेपर सुरळीतरित्या पार पडले आहेत. परंतु मराठी विषयाच्या पेपरची प्रश्नपत्रिका तयार करताना योग्य ती काळजी घेण्यात आलेली नाही. तसेच प्रश्न विचारताना अनेक चुकीचे शब्द वापरण्यात आले.
त्यामुळे पेपरला सुरुवात झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. मात्र प्रश्नपत्रिकेत चुका असून परीक्षा काळात याबाबत कोणाकडेही तक्रार करता आली नाही, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. ‘जवाहरलाल’ या शब्दाऐवजी ‘जव्हार’, ‘माळावरल्या हिला सुरेख नजरांना मिळाला आहे’, ‘कवी अमर शेख ही मुद्दा धोक्यात आहे’ असे म्हणतात. ‘विश्वाहून’ या शब्दाची विभक्ती, ‘पसायदान या संतांने लिहिलेले’ आहे, यांसह एकूण १४ प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आले आहेत.
यापूर्वी एखाद्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न विचारण्यात आले, तर प्रश्नपत्रिकातील चुकांबाबत विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्यात येत होते. मात्र सरकारने यापूर्वीच विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत ग्रेस गुण दिले जाणार नाहीत, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका असल्या तरी वाढीव गुण मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका चुका राहणार नाहीत, याची काळजी प्रश्नपत्रिका छपाईवेळी घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
४३३ विद्यार्थी गैरहजरबारावीचा बुधवारी राज्यशास्त्र (पॉलिटिकल सायन्स) व संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्स) विषयाचा पेपर झाला. या पेपरला बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील नवोदय ९,७६६ विद्यार्थी हजर होते, तर ४३३ विद्यार्थी गैरहजर होते. गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक पेपरला वाढत असल्याचे दिसून आले आहे.