'पिंगा गं पोरी पिंगा' (Pinga Ga Pori Pinga) मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. वल्लरीसमोर समीरचे खरे रूप येताच ती येत्या भागामध्ये प्रेरणाला तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द्व आवाज उठवण्यास प्रवृत्त करताना दिसणार आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत वल्लरीसमोर अखेर समीरचा चेहरा येणार आहे. प्रेरणा भोगत असलेला त्रास वल्लरीला कळणार आहे. समीरचा रागीट स्वभाव, प्रेरणाला तो देत असलेली वागणूक हे चुकीचं आहे आणि याची जाणीव वल्लरी प्रेरणाला करून देताना दिसणार आहे.
"समान मान स्त्रीला मिळायला हवा, तिची अस्मिता खोडू नका. जशी घर सांभाळणारी गृहलक्ष्मी आपल्यात असते तशीच अन्यायाविरुध्द्व लढणारी देखील आपल्यात असते." वल्लरीने दिलेल्या या मोलाच्या सल्ल्यानंतर प्रेरणा आपल्यावर होणाऱ्या अन्यायविरुध्द्व आवाज उठवेल का? हे मालिकेत पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
सक्षमीकरणाविषयी बोलताना ऐश्वर्या शेटे म्हणाली की, "स्त्री ही स्वतःचं रक्षण करायला सक्षम आहेच. पण त्याचबरोबर आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्यावर मात करून यशस्वी होण्याचे सामर्थ्य सुद्धा स्त्रीकडे आहे. कधी आपल्या माणसांचा पाठिंबा लाभेल तर कधी नाही लाभणार, कधी यश येईल तर कधी हार सुद्धा अनुभवावी लागेल, पण या सगळ्यात स्त्रीची जिद्द कधी कमी होणार नाही. "
पुढे ऐश्वर्या बोलते की, " ही जिद्द प्रत्येक स्त्रीमध्ये असते हे आम्ही आमच्या मालिकेतून दाखवायचा प्रयत्न करतो आहे. घर म्हणजे स्त्रियांची चौकट ह्या विचाराला मोडून काढणारी आजची स्त्रियांची पिढी आहे . स्त्री घरापासून दूर राहून स्वतःच आयुष्य घडवते. स्त्री घरापासून दूर राहून सुद्धा घर उत्तम सांभाळू शकते. फक्त घरच नाही तर प्रत्येक क्षेत्राला आणि देशालासुद्धा स्त्री समृद्ध करू शकते. आतापर्यंत किती तरी स्त्रियांनी हे करून दाखवलं आहे. त्यामुळे उदाहरण द्यायची आता गरज उरली नाही असं मला वाटत."
'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका कलर्स मराठीवर संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळते. यंदा महिला दिनानिमित्त ८ मार्चला मालिकेचा विशेष भाग दाखवण्यात येणार आहे.