Mohammed Shami Ramzan Fast: भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात एनर्जी ड्रिंक घेतले होते. त्यावरुन मौलाना नाराज झाले होते. मोहम्मद शमीने रमजानमध्ये रोजा ठेवला नाही, हा प्रकार शरीयतच्या नजरेत गुन्हा आहे, असे उत्तर प्रदेशातील बरेलीच्या मौलानांनी म्हटले होते. त्यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणात गदारोळ सुरु आहे. आता मोहम्मद शमीचे समर्थन करण्यासाठी माजी कोच बदरुद्दीन सिद्दीकी आले आहेत.
बदरुद्दीन सिद्दीकी यांनी म्हटले की, मोहम्मद शम्मी याचा या प्रकरणात दोष नाही. संपूर्ण देश त्याच्या पाठीशी आहे. देशापुढे काही नाही. ‘नेशन फस्ट’ हा संदेश सर्व मौलवींना मला द्यायचा आहे. तो रोजा नंतरही ठेवू शकतो. आमचा इस्लाम इतका लहान नाही की तो एका जागी संकुचित होऊ शकेल. इस्लाममध्ये असेही आहे की जर तुम्ही आजारी असाल तर तुम्ही नंतर रोजा ठेवू शकता. जे हा प्रश्न उपस्थित करत आहेत ते देशाचे समर्थन करत नाहीत. शमी देशासाठी काहीही करण्यास तयार आहे. अगदी रोजाही सोडत आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळाणार आहे. त्यावेळी अशा विधानांमुळे खेळाडूंचे मनोबल खचेल. तुम्ही मूर्खपणाचे वक्तव्य करत आहात. तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार कोणी दिले? असा प्रश्न सिद्दीकी यांनी मौलवांना विचारला.
मोहम्मद शमीचा भाऊ हसीब शमी म्हणाला की, शमी एक खेळाडू आहे. त्याला जेव्हा सामना खेळायचा असतो तेव्हा तो रोजा ठेवत नाही. कारण गोलंदाजीत खूप मेहनत करावी लागते. यामुळे या परिस्थितीत तो रमजान महिन्यात उपवास करू शकत नाही. सामन्यानंतर तो रोजा ठेवेल.
दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान मोहम्मद शमीचा ज्यूस पितानाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यावर बरेलीच्या मौलानांनी नाराजी व्यक्त केली. ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, इस्लाममध्ये रोजा ठेवणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे. जर एखाद्या व्यक्ती रोजा ठेवत नसेल तर तो पापी आहे. रोजा ठेवणे हे कर्तव्य असूनही मोहम्मद शमीने ठेवला नाही. त्याने मोठा गुन्हा केला आहे. तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार आहे.