कुकाणे : भेंडा येथील नेवासे-शेवगाव राज्य मार्गालगत दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांवर बुधवारी एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर हातोडा. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जेसीबी, पोलिस फौजफाट्यासह दहा वाजल्यापासून कारवाईला प्रारंभ केला. मध्यापासून १५ मीटर अंतर मार्किंग करताच बहुतांश अधिक्रमणधारकांनी अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. सायंकाळपर्यंत दीडशे ते दोनशे अतिक्रमणांवर ‘जेसीबी’ चालून जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईमुळे शेवगाव-नेवासे राज्य मार्गाने घेतला मोकळा श्वास.
भेंडा येथील शेवगाव-नेवासे राज्यमार्गाच्या लगत दुतर्फा सुमारे दीडशे ते दोनशे अतिक्रमणधारकांना मागील महिन्यात नोटिसा देण्यात आल्या होत्या. तेव्हापासून अतिक्रमणधारकांत खळबळ उडाली होती, हे अंतर कमी करण्यासाठी ग्रामस्थ व व्यावसायिकांनी उपोषण केले होते. लोकप्रतिनिधींनी अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते; मात्र अंतर कमी झाले नाही, शेवटी २० ते २५ दिवसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आज पोलिस बंदोबस्तात सर्व फौजफाट्यासह अतिक्रमण काढण्यास सकाळी दहा वाजता सुरुवात केली.
मध्यापासून ५० फुटांचे मार्किंग केल्यानंतर बहुतांश अधिक्रमणधारकांनी आपले नुकसान होऊ नये यासाठी अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. सायंकाळपर्यंत अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू होते. सुमारे दोनशे अतिक्रमणांवर ‘जेसीबी’ चालवण्यात आला. त्यामुळे येथील संपूर्ण बाजारपेठ उदध्वस्त झाली. अतिक्रमण चालू असताना बघ्यांची खूप गर्दी होती. याशिवाय ज्यांचे दुकाने अतिक्रमणाच्या कारवाईत उदध्वस्त होत होती, ते सर्व हताश नजरेने पहात होते. आजच्या या कारवाईसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व त्यांचे सर्व अभियंत्ये व कर्मचारी जेसीबी, तसेच पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे यांच्यासह दोन पोलिस अधिकारी, १० पोलिस कर्मचारी, १० होमगार्ड, असा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
रोजीरोटीचा प्रश्न निर्माणभेंडा येथील बाजारपेठ ३० ते ३५ वर्षांपासून नेवासे-शेवगाव राज्य मार्गालगत दुतर्फा थाटलेली होती. लाखोंचे व्यवहार या दुकानांमधून दररोज होत होते, आज मात्र अतिक्रमण कारवाई संपूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे. अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
भेंडा येथील नेवासे-शेवगाव राज्यमार्ग लगत असलेले अतिक्रमणे आज हटवण्यात आली. मात्र, यानंतर कोणी अतिक्रमणे केल्यास त्यास पूर्वसूचना ने देता अतिक्रमणे काढून घेण्यात येतील. आज भेंड्याचे काम संपल्यानंतर उद्यापासून कुकाणा येथील अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. आजच भेंडा ते कुकाणा संपूर्ण राज्य मार्गावर मोजणी करून मार्किंग करण्यात आले आहेत.
- सुरेश दुबाले, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नेवासे