Nithin Kamath SIP Investment Advice : तुम्हीही SIP किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. यातच शेअर बाजाराच्या पडझडीत पैसे कसे कमावता येतील किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का? यावर तज्ज्ञांनी त्यांचे मत सांगितले आहे.
डीएसपी म्युच्युअल फंडाचे एमडी आणि सीईओ कल्पेन पारेख म्हणाले की, आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सुवर्णकाळ आहे. ते पुढे म्हणाले की, बाजारातील घसरणी दरम्यान, एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आली आहे. कारण आता तुम्हाला कमी पैशात जास्त युनिट्स मिळू शकतात. अशा परिस्थितीत, आपण दीर्घकालीन मोठ्या नफ्याची अपेक्षा करू शकतो.
360 वन ॲसेटचे सीईओ राघव यांच्या मते, यावेळी एसआयपी करण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. क्वांटम एमएफचे सीईओ जिमी पटेल यांच्या मते, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एसआयपी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्सझटपट श्रीमंत होण्याऐवजी, दीर्घकाळात तुम्हाला नेहमी परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या संधी शोधा.
केवळ बचतीवरच नव्हे तर गुंतवणुकीवर भर दिला पाहिजे. स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्वातंत्र्याची काळजी घ्या.
गुंतवणुकीबद्दल सतत शिकत रहा.
एक छोटीशी गुंतवणूक दीर्घ कालावधीत आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाची असते.
परदेशी गुंतवणूकदार पैसे काढत आहेत, आणि व्यापारयुद्ध वाढण्याच्या भीतीमुळे ही परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओबाबत चिंतेत आहेत.
Zerodha चे संस्थापक आणि CEO नितीन कामत यांनी SIP थांबवू नका, असा सल्ला दिला आहे. "कोविड-19 नंतरचे हे पहिलेच मोठे करेक्शन आहे. ज्यांनी कोरोनानंतर गुंतवणूक सुरू केली, त्यांच्यासाठी हे मार्केट सायकल समजून घेण्याची योग्य वेळ आहे," असे ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, अनेक बाजारातील अनिश्चिततेमुळे SIP बंद करत आहेत. पण हा चुकीचा निर्णय आहे, असे त्यांनी सांगितले. कामत यांनी उदाहरण देत सांगितले की, 2020 मध्ये मोठ्या, मध्यम आणि लहान कंपन्यांचे शेअर्स 25-40% पडले होते, पण त्यानंतर त्यात 200-400% वाढ झाली.
"जर तुम्ही योग्य फंडात नियमितपणे गुंतवणूक केली आणि शिस्त पाळली, तर दीर्घकाळात चांगला नफा मिळू शकतो," असे त्यांनी सांगितले.
नोंद - क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.