Satish Bhosale new video viral : बीडच्या शिरूर तालुक्यातील एका तरुणाला मारहाण करताना आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याचा व्हिडिओ काल दिवसभर सोशल माध्यमातून व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.
सतीश भोसलेचा दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यात तो नोटांची बंडलं गाडीच्या बोनेटवर टाकताना दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ सोशल मीडायत शेअर करून हा कार्यकर्ता कोण? आणि याच्याकडं एवढे पैसे कुठून आले? याची चौकशी करा आणि त्याला तात्काळ अटक करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दमानियांचा आरोप काय?अंजली दमानिया यांनी सतीश भोसलेच्या व्हिडिओबाबत सांगितलं की, जालन्यातून एक भयानक व्हिडिओ समोर आला होता. तो ट्विट करण्याची माझ्यात हिंमत नव्हती. या व्हिडिओत बोराडे नामक तरुणाचे कपडे काढले आणि त्याला चटके दिले. बीडच्या पाण्यातच गुंडगिरी आहे. 19 फेब्रुवारी रोजी एका तरुणाला इतकं मारलं की त्याचे सर्व दात तुटले. सतीश भोसले असं मारणाऱ्याचं नाव आहे. हा सुरेश धस यांचा कार्यककर्ता आहे. जे सध्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे करत आहेत तेच धस आणि त्यांचे कार्यकर्ते करत आहेत.
तरुणाला मारहाणीनंतरचा सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये हा भोसले नोटा फेकताना दिसतो आहे. उद्या हाच सतीश भोसले वाल्मिक कराड होईल. मी त्याचे अनेक व्हिडिओ ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये टाकले आहेत. म्हणून भोसलेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. सुरेश धसांना हा सतीश भोसले बॉस, सरकार आणि विठ्ठल असं संबोधतो. जसा वाल्मिक कराड गाड्यांचा ताफा घेऊन फिरत होता तसाच हा पण करतोय. हे तरुण हातात, गळ्यात इतकं सोनं घालून काय करतात? हे खरेदी करायला त्यांच्याकडं पैसे आले कुठून? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात बोललं पाहिजे. ते जर नाही बोलले तर मी विधानभवनाबाहेर आंदोलन करणार आहे.
सुरेश धस यांचा आपल्या या कार्यकर्त्याला पूर्ण सपोर्ट आहे. या दोघांचा कॉल रेकॉर्डही मी तुम्हाला दिला आहे. माझा 100 टक्के तुला सपोर्ट आहे, असं धस यांनी या कॉलमध्ये म्हटलं आहे. धस यांनी खोटं बोलू नये जे खरं आहे ते बोलावं. आष्टीमध्ये ते चिकन आणि दारू पार्टी देतात त्यात सर्व गुन्हेगार आहेत. म्हणून मी बीडच्या आंदोलनात गेले नाही. फडणवीस जर यावर बोलले नाहीत तर मी उद्या दिवसभर विधानभवनात ठिय्या देणार आहे, असा इशाराही अंजली दमानिया यांनी दिला आहे.