राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. मुंबईमध्ये विविधतेत एकता आहे. शहरात विविध राज्य, प्रांतांचे तसेच भाषा बोलणारे लोक राहतात. त्यांची वेगवेगळी भाषा आहे. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकले पाहिजे, असे नाही, असं भैय्याजी जोशी यांनी म्हटलं आहे. यावरून आता राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी यावरून भैय्याजी जोशी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
त्यानतंर उद्धव ठाकरे हे थेट हुतात्मा स्मारक येथे पोहोचले त्यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं आहे. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी माझी भूमिका मांडली आहे, आता पुन्हा पुन्हा तेच सांगण्यात काही अर्थ नाही. त्यांनी कितीही विष कालवलं तर ते मुंबई मराठी माणसांपासून तोडू शकत नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता भैय्याजी जोशी यांच्या या वक्तव्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
भैय्याजी जोशी यांच्या या वक्तव्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे, भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. ते मराठी -अमराठी विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कोणी कितीही विष कालवलं तरी मुंबई महाराष्ट्रापासून हिसकू देणार नाही. मुंबई तोडण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात फूट पाडणारे ही लोक अनाजीपंत आहेत असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान भैय्याजी जोशी यांच्या या वक्तव्यामुळे आता भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील पोस्ट करत चांगलंच सुनावलं आहे. उद्धव ठाकरे यांनी तर या वक्तव्यानंतर हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं आहे.