क्रिकेट चाहत्यांचं लक्ष सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनलकडे लागून आहे. या महाअंतिम सामन्यात 9 मार्च रोजी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर 22 मार्चपासून आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार रंगणार आहे. मात्र त्याआधी आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने त्रिसदस्यीय एकदिवसीय मालिकेची घोषणा केली आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार टीम इंडियासह एकूण 3 संघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.
भारतात सध्या वूमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेची सांगता 15 मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका वूमन्स यांच्यात वनडे सीरिज खेळवण्यात येणार असल्याचं आयसीसीने सोशल मीडियावरुन जाहीर केलं आहे. या त्रिकोणी मालिकेत एकूण 3 संघात 7 सामने खेळवण्यात येणार आहेत.
या त्रिकोणी मालिकेचं आयोजन हे 27 एप्रिल ते 11 मे दरम्यान करण्यात आलं आहे. या मालिकेच्या यजमानपदाचा मान हा श्रीलंकेकडे आहेत. स्पर्धेतील सातही सामने हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. प्रत्येक संघ साखळी फेरीत 4 सामने खेळणार आहे. त्यानंतर अव्वल 2 संघात अंतिम सामना खेळवण्यात येईल.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका, 27 एप्रिल, आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 29 एप्रिल, आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 1 मे, आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया, 4 मे, आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया, 6 मे, आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 8 मे, आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
अंतिम सामना, 11 मे, आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
टीम इंडिया यजमान श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी 2 सामने खेळणार आहे. टीम इंडिया या मालिकेतील सलामीच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भिडणार आहे. तर टीम इंडिया साखळी फेरीतील आपला अखेरचा सामना हा 6 मे रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. तसेच टीम इंडिया 27 एप्रिल ते 6 मे दरम्यान आणखी 2 सामने खेळणार आहेत. त्यात टीम इंडियाची महिला ब्रिगेड श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 हात करणार आहे.