माणकोलीत क्रिकेटप्रेमींची उत्कंठा शिगेला
esakal March 07, 2025 06:45 AM

भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक क्रिकेट स्पर्धेत दिग्गज खेळाडूंचा बहारदार खेळ प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. प्रकाशझोतातील सामन्यात फटकेबाजी, भेदक गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहण्यासाठी हजारो क्रिकेटप्रेमी माणकोलीत आले आहेत.
माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील यांच्या संकल्पनेतून माणकोलीत श्री गुरुदत्त हिरवा कवठा मैदानावर क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी, कपिल पाटील फाउंडेशन, सिद्धिविनायक अंजूर, जॉयकुमार युवा प्रतिष्ठान, एकवीरा स्पोर्ट्स, गुरुदत्त चवठा हिरवा माणकोली आणि दिवा स्पोर्ट्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख आयोजक प्रशांत पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील संयोजन समितीचे अध्यक्ष प्रताप पाटील, स्वागताध्यक्ष राम माळी, भानुदास पाटील, सूर्यकांत पाटील, हरेश भोईर, योगेश भोईर आदींनी मेहनत घेतली आहे.
-------------------------------------------
एकापेक्षा एक सरस संघांची हजेरी
आयपीएलच्या धरतीवर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत ऑल इंडिया गटात चॅलेंज स्पोर्ट्स व रिग्नेश इलेव्हन दिल्ली धमाका, एन. बी. धनकवडी, पुणे आणि रेड डेव्हिल्स अमर साई यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर बोनकोडे संघाचा पार्थ चंदन, हिंदवी प्रतिष्ठानचा किरण पवार, रिग्नेश इलेव्हन दिल्ली धमाकाचा संजू कनोजिया यांनी चमकदार अर्धशतकांच्या खेळी केल्या. तर बाळकूम संघाच्या दीपेश मानेची मेडन ओव्हर, यश मित्र इलेव्हन, टेंभिवलीचा परेश गोराडकर व शिवशक्ती कडाव संघाचा भावेश गायकवाड यांनी घेतलेली हॅट्ट्रिकने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.