- डॉ. दिनेश बारी, saptrang@esakal.com
आपण सर्वांनी टीव्हीवर ‘भाग-दौड भरी जिंदगी... थकना मना हैं।’, ही जाहिरात बघितली असेल. का बरं, थकना मना हैं ? कारण तुम्ही थकले, तर झोपणार किंवा आराम तरी करणार... मग आमच्या जाहिराती कोण पाहणार ? आमचे प्रॉडक्ट्स कोण विकत घेणार ?... म्हणून ‘थकना मना हैं..!’ एक मानसिकता तयार करायची आणि एकदा ती झाली की मग यांचा खप सुरू... यंत्राला सुद्धा आराम द्यावा लागतो पण तुम्ही..? तुम्ही पळत राहा.. ऊर फुटेस्तोवर... आणि मरा अकाली...!!
यंत्रामध्येही वेअर आणि टेअर म्हणजे झीज होत असते. तसा फरक मानवी शरीरातही होत असतो, एक विशिष्ट वय पार केल्यानंतर थोड्याफार शारीरिक कुरबुरी सुरू होतात, हे खरे. परंतु, संतुलित व सात्त्विक आहार तसेच योग्य व्यायाम, योगा व ध्यानसाधना आपल्याला एक निरामय आयुष्य जगण्यास निश्चित साह्य करू शकतात. ज्या गोष्टी आपल्याला निकडीच्या नाहीत, त्यांची जाहिरात नसते.
त्यामुळेच पूर्वी गहू, बाजरी, ज्वारी अशा जीवनावश्यक गोष्टींची जाहिरात नसायची. पण यातसुद्धा आता वेगवेगळ्या कंपन्या आल्यात आणि आमचाच प्रॉडक्ट कसा सकस आहे, फायबरयुक्त आहे, प्रोटिन, व्हिटॅमिनवाला आहे याची स्पर्धा सुरू झाली. हे जाहिरातीचं मायाजाल आपल्या मानसिकतेवर आघात करतं आणि मग आपली फरफट सुरू होते.
त्यामुळे माझं वैयक्तिक मत असे आहे, की काम तर करायचंच..., खूप काम करायचं, पोटापाण्यासाठी आणि संसाराचा गाडा ओढण्यासाठी ते आवश्यकच आहे. पण दिवसभराच्या कामानं थकवा वाटला, तर थकायचंसुद्धा आणि पुरेशी विश्रांती तर घ्यायचीच घ्यायची, आपल्या कुटुंबात मस्तपैकी रमायचं, मुलाबाळांशी खेळायचं. ताजेतवाने होऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या दमानं कामाला लागायचं. मात्र ‘थकना मना हैं।’ वगैरेसारखी आपली मानसिकता होऊ द्यायची नाही. स्वाभाविक आयुष्य जगायचं, आहे तसं स्वीकार करून पण आनंदाने, समाधानाने मग त्याचाही सोहळा करता येतो..!
समाजाच्या काही मानसिकता पण अशाच जीवघेण्या..! ‘मर्द को दर्द नही होता’ असेल किंवा ‘मर्द होके आसू बहा रहे हो’... अरे बाबांनो, दर्द होणं, रडणं हे माणूस असण्याचं जिवंत लक्षण आहे ना, याचा कधी विचार केला का ? दुखणं-खुपणं... शारीरिक असो किंवा विशेषतः मानसिक... भावना व्यक्त करू द्या की... आतली घुसमट बाहेर पडू द्या, मन हलकं होऊ द्या. आतल्याआत भावना कोंडून हृदयविकार वाढलेत, आत्महत्या होत आहेत ना !
हे टाळायचं असेल तर भरभरून आयुष्य जगणे हाच पर्याय..! पुरुषाचं शरीर काही पोलादी आणि मन काही दगडाचं बनलेलं नाही. त्यामुळे पुरषानेसुद्धा कधी कोणत्या विनोदावर किंवा असंच... हसावंसं वाटलं तर मनमुराद हसावं..., आणि काही आर्थिक नुकसान असो वा मानसिक धक्का, सहन होत नसेल, तर ओक्साबोक्शी रडावंसुद्धा... पार अश्रूवाटे पूर्ण दुःखद भावना बाहेर पडेपर्यंत आणि मोकळे व्हावे... पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात करावी.
महिलांबाबत समाजाच्या मानसिकता तर एक ना अनेक... त्यावर आताच लिहायला घेतलं तर पुस्तकंच्या पुस्तकं तयार होतील. पुढच्या भागात आणखी विस्ताराने लिहिणारच आहे. त्यातील प्रामुख्याने ‘चूल आणि मूल’ हेच महिलांचे काम ही एक पूर्वांपार चालत आलेली समाजाची मानसिकता..! त्यामुळे टीव्हीवरच्या ‘आपके घर में कौन रहता हैं, कमरदर्द या...?’
या टॅगलाइनच्या वेदनाशामक क्रीमच्या जुन्या जाहिरातीमध्ये आपण बघितलं असेल, त्या गृहिणीला कोणी चष्मा मागतो, कोणी पिझ्झा करायला सांगतो, कोणी मेंदी लावून द्यायला सांगतो, तर कोणी पकोड्याची ऑर्डर सोडतो. सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करता करता बिचारीची कंबर दुखायला लागल्यावर सासरेबुवा एकदम ओरडतात, सर्व जण फक्त ऑर्डर देत आहेत, सुनेच्या वेदना ऐकल्या का कोणी? पुढे काहीतरी चांगलं घडेल या अपेक्षेने आपण लक्ष केंद्रित करतो मात्र त्या ‘क्रीम’कडे इशारा होतो.
सासूबाईच्या हातातून दिली गेलेली ती क्रीम फिरत फिरत नवऱ्याकडे जाते आणि नवरा ती लावून देतो. संपली कुटुंबातील सदस्यांची जबाबदारी... आणि पुन्हा ऑर्डर्स सोडणे सुरू... आणि ती गृहिणी पण हसत त्याला प्रतिसाद देते. यात कोणालाच काही वावगं वाटत नाही, कारण मानसिकता, ‘चूल आणि मूल’ही प्रतिमा..! म्हणूनच फर्माईशी कमी करून कामात थोडा हातभार लावावा किंवा स्वतःची कामं स्वतः करावी, असं कोणाला वाटत नाही.
आणखी एका मुद्द्याबाबत लिहिणे आवश्यक आहे, ज्याकडे कोणाचेच अद्याप लक्ष गेलं नाही, असा माझा समज आहे. तो मुद्दा म्हणजे, सामाजिक जीवनात विशेषतः राजकीय कुरघोडीत, ‘आम्ही काही हातात बांगड्या भरल्या नाहीत,’ असे बोल हमखास ऐकायला मिळतात. याचा अर्थ काय? बांगड्या कोणाच्या हातात असतात ?... तर महिलांच्या... म्हणून बांगड्या असणारे हात म्हणजे कशाचं प्रतीक या ठिकाणी गृहीत धरले आहे... तर अबला... प्रत्युत्तर न देऊ शकणारी हतबल नारी, असं गृहीतक वर्षानुवर्षे मांडलं जात आहे!
केवळ पुरुषच असं समजतात असं नव्हे, तर काही महिलासुद्धा एखादं काम वेळेत झालं नाही जसे पाणीप्रश्न असेल किंवा रस्त्याचा प्रश्न असेल तर संबंधित अशा एखाद्या अकार्यक्षम अधिकारी किंवा तत्सम व्यक्तीस बांगड्या भेट देतात. तेव्हा मात्र मला फार वाईट वाटतं, काय बोलावं?
तसं बघू गेलं तर आजकाल महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने वाटचाल करीत आहेत. त्यामुळे जरा कुठे दुजाभाव आढळला, तर महिला संघटना लगेच आक्रमकपणे आंदोलनाच्या पवित्र्यात येतात, ही अत्यंत स्वीकारार्ह आणि स्वागतार्ह बाब. परंतु, या ‘बांगड्या’ प्रकरणी कोणती महिला संघटना आंदोलन काय साधा निषेधसुद्धा करताना माझ्या तरी ऐकिवात नाही. असो.
तर पुरुषांबद्दल असो की महिलांबद्दल असो... ही मानसिकता बदलायची असेल, तर सुरुवात स्वतःपासून करावी लागेल, समाजाने तयार केलेल्या स्त्री-पुरुष नावाच्या साच्यामधून बाहेर पडून मुक्त व्हावे लागेल आणि भाव-भावनांविषयी संवेदनशीलता जपून एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून समग्रतेने जगावं लागेल, एवढे मात्र नक्की..!
(लेखक हे पोलिस दलातील नागरी दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र, फोर्स वन, मुंबई इथे पोलिस अधीक्षक आहेत.)