मुंबई : एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती झाली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महिन्यापूर्वी महामंडळाच्या अध्यक्षपदी अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती केली होती. सेठी यांची नियुक्ती करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह दिला जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.
शिवसेनेच्या खात्यात हस्तक्षेप होत असल्याचेही बोलले जात होते. मंत्री सरनाईक यांच्या निवडीने या चर्चांना पूर्णविराम देत, दोन्ही पक्षात निर्माण झालेली कटुता कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्याच्या परिवहन खात्याची ज्या मंत्र्यांवर जबाबदारी असते, त्यांच्याकडेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष देण्याची परंपरा आहे. दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना २०१४ ते २०१९ या कालावधीत एसटी महामंडळाचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच होते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हणजे २०१९ ते २०२२ या काळात अनिल परब यांच्यावर परिवहन खात्यासह एसटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना परिवहन आणि एसटी महामंडळाची जबाबदारी त्यांनी स्वतःकडेच ठेवली होती. ही परंपरा फडणवीस यांनी मोडली होती.