बीड : मारहाण आणि नोटांचे बंडल उधळण्याच्या चित्रफीतीमुळे चर्चेत आलेला कुख्यात गुंड सतीष भोसले ऊर्फ खोक्या याच्या झापेवाडी शिवारातील घरावर शनिवारी वन विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या पथकाने छापा मारला. यावेळी वन्यजीवांची शिकार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य पंचनामा करून जप्त करण्यात आले.
झापेवाडी शिवारात वन विभागाच्या जागेत राहत असलेल्या सतीश भोसले या गुंडाने महारखेड (ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) येथील कैलास वाघ याला अमानुष मारहाण केली होती. त्यानंतर बावी येथील ढाकणे पिता-पुत्रालाही हरणाची शिकार करू दिली नाही म्हणून मारहाण केली होती. या दोन्ही घटनांच्या चित्रफिती व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांकडून आणि ढाकणे पिता-पुत्रांकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर कारवाईला गती आली आहे.
भोसले सध्या फरार आहे. वन विभागाकडून आज सतीश भोसलेच्या झापेवाडी शिवारातील घरावर छापा टाकून झडती घेण्यात आली. त्यामध्ये प्राण्यांचे वाळलेले मांस, वन्यजीव पकडण्यासाठी वापरले जाणारे तीन वाघूर, दोन पिंजरे, १ सत्तूर, तितर पकडण्यासाठी लागणारे फांजे असे साहित्य मिळून आले. यासह गांजाचे पाकीटही सापडले आहे. त्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
‘खोक्या’ अद्याप फरारसतीश भोसले ऊर्फ खोक्यावर दोन गुन्हे दाखल होऊन तीन दिवस झाले तरी पोलिसांकडून अद्याप आरोपीला अटक झालेली नाही. आरोपीला पकडण्यासाठी एक अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
आज शिरूर बंदचे आवाहनबावी येथील शेतकरी ढाकणे यांना ‘खोक्या’कडून झालेल्या मारहाण प्रकरणाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी (ता. नऊ) शिरूर कासार तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.