रोहित पुन्हा टॉस हारला, न्यूझीलंडचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, भारताकडून संघात कोणताही बदल नाही
BBC Marathi March 10, 2025 10:45 AM
Getty Images

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुबईत होणाऱ्या फायनलमध्ये भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करणार आहे. रोहित शर्मा सलग 12 टॉस हारला. त्यामुळं न्यूझालंडचा कर्णधार सँटनरनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

न्यूझीलंडच्या संघातून मॅट हेन्री दुखातीमुळं बाहेर पडला आहे. तर भारत सेमिफायनलमध्ये खेळलेल्या संघासहच मैदानात उतरला आहे.

विजेतेपदासाठी भारतीय संघ फेव्हरेट असल्याचं म्हटलं जात आहे. कागदावर आणि मैदानावरही भारतीय संघ प्रबळ ठरल्याचं पाहायला मिळालं आहे.

त्याचवेळी प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या संघानं आतापर्यंत आयसीसी स्पर्धांत भारताला कडवं आव्हान दिल्याचं तथ्य नाकारता येणार नाही.

भारतीय संघाचा विचार करता संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील आतापर्यंतचा सर्वांत यशस्वी संघ अशीच भारताची कामगिरी राहिली आहे. त्यामुळंच भारतीय संघाला विजेतेपदाचा दावेदार समजलं जात आहे.

आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यात भारतीय संघाच्या एकत्रित कामगिरीनं पराभवाला पूर्णपणे दूर ठेवलं आहे. रोहित शर्माचं कर्णधारपद, कोहलीचा परतलेला फॉर्म, गोलंदाजी फलंदाजांचे भरपूर पर्याय आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचं कसब अशा सर्वच पातळ्यांवर भारतीय संघानं अव्वल कामगिरी केली आहे.

BBC

BBC

पण त्याचवेळी समोर असलेला प्रतिस्पर्धी न्यूझीलंडचा संघ असल्यानं अत्यंत विचारपूर्वक पावलं उचलावी लागतील. कारण, मोठ्या स्पर्धांमध्ये आश्चर्यकारक खेळ करून वेगळा निकाल लावण्याची क्षमता यासंघात आहे.

शांत आणि संयमी असलेल्या या संघातील खेळाडूंचा दर्जा पाहता भारतीय संघाला काही गोष्टींचा विचार करुनच मैदानात उतरावं लागणार आहे.

BBC

भारतीय फलंदाजीचा विचार करता स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना सलामीला फारच कमाल दाखवता आली नसली, तरी भारतीय फलंदाजी अगदीच ढेपाळलीही नाही.

तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या कोहलीला सूर गवसल्यानं ती सर्वात सकारात्मक बाब समोर आली आहे. शिवाय श्रेयस अय्यर आणि केएल राहुल त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. तसंच अक्षर पटेलला वरच्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णयही भारतीय संघासाठी आतापर्यंत कामी आल्याचं पाहायला मिळालं आहे.

Getty Images श्रेयस अय्यरनेही स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.

आयसीसी वन डे रँकिंगमध्ये सध्या पहिल्या 8 मध्ये भारताच्या शुबमन, विराट, रोहित आणि श्रेयस या चौघांचा दबदबा आहे.

पण असं असलं तरी न्यूझीलंड विरोधात झालेल्या साखळी सामन्यात भारतीय फलंदाजांना किवी गोलंदाजांनी हैराण केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याबाबत विचार करूनच भारतीय संघ आज नक्कीच मैदानात उतरेल.

BBC

स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी पाहता भारतीय गोलंदाजांनी अपेक्षेपेक्षा वरचढ कामगिरी केली आहे, असं म्हणणंही वावगं ठरणार नाही. विशेषत: फिरकीपटुंची जादू दुबईच्या मैदानावर चालताना दिसत आहे.

अक्षर, कुलदीप, जडेजा या तिकडीबरोबरच वरुण चक्रवर्तीनं अखेरच्या दोन सामन्यांत त्याच्या मिस्ट्री गोलंदाजीची झलक दाखवली आहे. न्यूझीलंडविरोधातही त्याची गोलंदाजी चांगलीच चमकली होती. त्यामुळं या सामन्यात तोही असणार असं दिसतंय.

Getty Images पूर्णवेळ वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळं जर चार फिरकी गोलंदाज असतील तर मोहम्मद शमी या एकमेव पूर्णवेळ वेगवान गोलंदासह भारत सामन्यात उतरण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्या दुसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका चांगली पार पाडत असल्यानं भारताला आतापर्यंत तशी अडचण जाणवली नाही.

पण तरीही वेगवान गोलंदाजांची कमतरता भारताला भासणार का? अशी एकप्रकारची चर्चा मात्र सातत्यानं सुरू आहे.

BBC

भारतीय संघ मजबूत दिसत असला तरी प्रतिस्पर्धी असलेल्या किवी संघाच्या विरोधात भारताला अत्यंत सावधपणे खेळावं लागणार आहे. किवी संघाचीही फलंदाजी आणि गोलंदाजी अत्यंत उत्तम आहे. पण त्यांचं क्षेत्ररक्षण हा आणखी जमेची बाजू आहे.

यापूर्वी साखळी सामन्यात विराटचा ज्याप्रकारे झेल ग्लेन फिलिपनं घेतला होता, त्यानं सर्वांनाच धक्का बसला होता. त्यामुळं कोणत्याही क्षणी हा संघ प्रतिस्पर्धी संघाला पछाडून उत्तम कामगिरी करू शकतो.

शिवाय मोठ्या सामन्यांत न्यूझीलंडची भारताविरोधातील कामगिरी चांगली राहिली आहे. 2000 मध्ये न्यूझीलंडने फायनलमध्ये भारताला पराभूत करुनच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

Getty Images

त्याशिवाय 2019 वर्ल्डकपमध्ये किवी संघानं सेमिफायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. तर 2021 च्या वर्ल्ड टेस्ट चॅपियनशिप फायनलमध्येही न्यूझीलंडनं भारताला पराभूत करुनच विजय मिळवला होता.

रोहित शर्माच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवत भारतानं आयसीसी स्पर्धांतील पराभवाची मालिका खंडित केली आहे. आता या स्पर्धांत विजयाची नवी मालिका सुरू करण्याची संधी भारतीय संघासमोर आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.