सॅकसॉफ्ट (शुक्रवारचा बंद भाव ः रु. १६३)
esakal March 10, 2025 11:45 AM

भूषण ओक

चेन्नईस्थित सॅकसॉफ्ट ही १९९९ मध्ये स्थापन झालेली कंपनी अनेकविध व्यवसायांसाठी डिजिटल परिवर्तन घडवून आणण्याचे सॉफ्टवेअर, तोडगे पुरवण्याचे काम करते. कंपनीची जगभरात सोळा कार्यालये आहेत. आजच्या युगात प्रत्येक व्यवसायात सर्व प्रकारच्या व्यावसायिक प्रक्रिया संगणकामार्फत चालतात. हे डिजिटल परिवर्तन झपाट्याने होत आहे. या प्रक्रियेत पारंपरिक व्यवसाय प्रक्रिया, संस्कृती आणि ग्राहक अनुभव यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून मूलभूत बदल घडवून आणण्यात येतो. प्रचंड प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करून, स्वयंचलित प्रक्रियांचा वापर करून आणि नव्या डिजिटल साधनांचा अवलंब केल्याने व्यवसाय अधिक कार्यक्षम, लवचिक आणि ग्राहकाभिमुख बनतात. थोडक्यात, डिजिटल परिवर्तन म्हणजे व्यवसायाला आधुनिक डिजिटल युगाच्या गरजांनुसार रूपांतरित करणे आणि त्यांना अधिक कार्यक्षम बनवणे. त्यात ही कंपनी मोलाचे योगदान देत आहे.

आर्थिक आकडेवारी

कंपनीची विक्री आणि निव्वळ नफा गेल्या तीन वर्षांमध्ये अनुक्रमे २५ टक्के आणि २८ टक्के चक्रवाढ दराने वाढले आहेत. कंपनी जवळजवळ कर्जमुक्त आहे आणि या वर्षीचा आरओसीई २७.७ टक्के म्हणजे उत्तम आहे. कंपनीच्या ताळेबंदावर एकूण मालमत्तेच्या सुमारे २१ टक्के हिस्सा रोकड आणि गुंतवणुकींमध्ये आहे म्हणजे ताळेबंद मजबूत आहे. मात्र, नव्या कंपन्या विकत घेण्याच्या धोरणांमुळे ताळेबंदावर जवळजवळ ५० टक्के रक्कम गुडविलमध्ये आहे, ही थोडी चिंतेची बाब आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांमध्ये गुडविल मूल्यात कोणतीही घट झालेली नाही. कंपनीची गेल्या पाच वर्षांची सरासरी रोकड आवक निव्वळ नफ्याच्या ८४ टक्के आहे.

मूल्यांकन

कंपनीचा शेअर सध्या २१.१ या पीई गुणोत्तराला उपलब्ध आहे, जे १८.६ या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा जवळपास आहे. पीईजी ०.९९, ईव्ही इबिटा गुणोत्तर १३.१ असे इतर आकडे वाजवी आहेत. या कंपनीची मुक्त रोकड आवक रकमेत (फ्री कॅश फ्लो) गेल्या तीन वर्षांमध्ये २२ टक्के चक्रवाढ झाली आहे. डीसीएफ पद्धतीनुसार पुढील पाच वर्षांसाठी मुक्त रोकड आवक रकमेत २० टक्के वाढ धरली, तरी कंपनीचे आंतरिक मूल्य ३१६ रुपये येते, जे सध्याच्या १६५ रुपये या भावापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे.

निष्कर्ष

सॅकसॉफ्ट ही एक वेगाने वाढणारी उत्तम कंपनी असून, गुंतवणूकदारांनी या कंपनीचा सद्यस्थितीत गुंतवणुकीसाठी अवश्य विचार करावा.

(डिस्क्लेमर ः हा लेख केवळ शैक्षणिक उद्दिष्टांसाठी असून, गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी त्यांच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अपेक्षित आहे.

चार उत्पन्न स्रोत
  • फिनटेक : यात आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. उदा. मोबाईल पेमेंट, सॉफ्टवेअर जोडणी (एपीआय), माहिती संकलन आणि प्रक्रिया आदी. यातून कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी जवळजवळ ३१ टक्के उत्पन्न येते.

  • उच्च तंत्रज्ञान मीडिया : अमेरिकेत वेगाने वाढणाऱ्या या क्षेत्रातून कंपनीचे ४२ टक्के उत्पन्न येते.

  • वाहतूक आणि दळणवळण : या क्षेत्रातून सुमारे १६ टक्के उत्पन्न येते. यात आयओटी सोल्युशन, मालवाहतूक व्यवस्थापन सॉफ्टवेअर, गोदाम व्यवस्थापन आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन आदींचा समावेश होतो. बाकी उत्पन्न आरोग्य तंत्रज्ञान, डिजिटल वाणिज्य आणि इतर स्रोतांमधून येते.

  • व्यवसायवृद्धी आणि विस्तार : कंपनीचे सध्याचे ८०० कोटींचे उत्पन्न २०३० पर्यंत चार हजार कोटींपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. छोट्या कंपन्या विकत घेऊन त्यामार्गे व्यवसायवृद्धीचे कंपनीचे धोरण आहे. आतापर्यंत या कंपनीने सॉलव्हेडा, ऑगमेंटो लॅब आणि सेप्टस सॉफ्टवेअर या कंपन्या घेतल्या आहेत. दरवर्षी एक कंपनी विकत घेण्याचे कंपनीचे धोरण आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.