महिलांनो, व्हा दक्ष!
esakal March 10, 2025 11:45 AM

शिरीष देशपांडे

सायबर चोरट्यांनी आता महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. प्रसिद्ध महिलांच्या नावाने खोट्या क्लिप्स फेसबुक, यू-ट्यूब, इन्स्टा, एक्स अशा विविध समाजमाध्यमांद्वारे पसरवल्या जात आहेत. त्यात मोठ्या आर्थिक लाभाचे, बक्षिसाचे आमिष दाखवले जाते आणि महिलांना जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. अशा अनेक घटना अलीकडे उघडकीस आल्या आहेत.

काही घटना

१ डीपफेक तंत्रज्ञान वापरून तयार केलेली, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी, लेखिका सुधा मूर्ती यांची एक बनावट क्लिप सध्या समाजमाध्यमावर फिरत आहे. यात सुधा मूर्ती एका ‘एआय’संबंधित काम करणाऱ्या बनावट कंपनीत २१ हजार रुपये भरा आणि लाखो रुपये मिळवा, असे आवाहन करताना दिसत आहेत. ही क्लिप खोटी आहे, हे लक्षात ठेवा.

२ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि अर्थमंत्री यांच्या नावानेसुद्धा अशीच क्लिप फिरते आहे. त्यात तंत्रज्ञानआधारित एका बनावट गुंतवणूक प्लॅटफॉर्ममध्ये पैसे गुंतवा आणि रोज हजारो रुपये कमवा, असे आवाहन केले जात आहे. व्हिडीओ डीपफेक तंत्रज्ञान वापरून या क्लिप तयार करण्यात आल्या आहेत.

३ॲमेझॉनची कुपने मोफत देऊन, त्याआधारे विश्वास संपादन करून फसवणूक करण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. नुकत्याच झालेल्या अशा प्रकारच्या एका गुन्ह्यात चोरट्यांनी ॲमेझॉनचे एक हजार रुपयांचे कुपन भेट म्हणून दिले. ते पैसे त्या महिलेच्या ॲमेझॉन अकाउंटवर जमाही झाले. त्याआधारे त्या महिलेचा विश्वास संपादन करून सायबर चोरट्यांनी थोडे थोडे करून ५१ लाख रुपयांना त्या महिलेला फसवले.

सर्वांनी घ्यावयाची काळजी

‘डीपफेक’ तंत्रज्ञान वापरून कोणाचाही हुबेहूब आवाज आणि फोटो तयार करून बनावट व्हिडीओ तयार करता येतात. त्यामुळे कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाने येणाऱ्या क्लिपवरील आवाहनाला प्रतिसाद देण्याआधी नीट विचार करा. असा व्हिडिओ किंवा जाहिरात समाजमाध्यमावर दिसली आणि त्यात नेहमीपेक्षा जास्त फायदा देण्याचे आश्वासन दिले जात असेल, तर नक्कीच त्यात काहीतरी धोका आहे, हे लक्षात घ्या.

अशी एखादी क्लिप पाहण्यात आली, तर गुगलवर त्यातील नावे टाकून शोध घ्या. अशा पद्धतीने सायबर चोरट्यांनी आधीच कोणाची फसवणूक केली असेल, तर त्याची माहिती मिळू शकेल.

कोणतीही गुंतवणूक करण्याआधी त्याबाबत माहिती मिळवून, स्वतः अभ्यास करून किंवा तज्ज्ञ व्यक्तीकडून सल्ला घेऊन गुंतवणूक करावी.

शेअर बाजारात डी-मॅट खात्याद्वारेच गुंतवणूक करता येते, त्यामुळे एखाद्या ॲपद्वारे गुंतवणूक करायची आहे, असे सांगितले जात असेल, तर सावध व्हा!

फसवणूक झाल्यास...

ताबडतोब https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.

१९३० या क्रमांकावर संपर्क साधावा. ही यंत्रणा ज्या खात्यात पैसे गेले आहेत, ती खाती गोठवण्याचे तातडीने प्रयत्न करते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.